॥ श्री गणेशाय नमः ॥
वसई विरार हा पूर्वीपासूनच हरित पट्टा म्हणून ओळखला जातो . सोनचाफा , तगर आणि इतर फुलशेती, केळी आणि नारळीच्या बागा, आणि इतर भाजीपाला ह्या पट्टयात अगदी विपुल प्रमाणात पिकतो . पूर्वेला जिवदानीचा आणि बारोंडा देवीचा डोंगर, पश्चिमेला पंचवीसेक किलोमीटरचा समुद्र किनारा, उत्तरेला वैतरणेची खाडी आणि दक्षिणेला उल्हासची (वसईची) खाडी अशा भौगोलिक रचनेत वसलेला हा प्रदेश ! समुद्र आणि खाड्यांमधलं खारट पाणी सिंचनासाठी वापराला सोयीस्कर नव्हतं . पावसाचं पडलेलं पाणी समुद्र जवळ असल्यामुळे अगदी सहज समुद्रात वाहून जात असे . आणि म्हणूनच सिंचनासाठी बावखळांची निर्मिती झाली .
बावखळ
बाव म्हणजे विहीर आणि खळ म्हणजे खडडा ! म्हणजेच पाणी साठवण्यासाठी विहीरी सारखा गोल खोलाकार खड्डा म्हणजे बावखळ .पण मग त्याला विहीरच का नाही म्हणत हे समजण्यासाठी आपल्याला बावखळांची रचना नीट समजून घ्यावी लागेल .
चित्र क्र. १ . बावखळांची रचना आणि वैशिष्ट्ये .
चित्र क्रमांक एक मध्ये दाखवल्याप्रमाणे तळाशी बेसॉल्ट खडक सापडतो .बेसॉल्ट खडक हा भुजलधारक आहे . भुसभुशीत कडा ह्या नैसर्गिक उतारावरून येणाऱ्या पाण्याला आत मध्ये झिरपण्यासाठी मदत करतात . बावखळ गोलाकार किंवा चौकोनी असतं . त्याचा व्यास विहीरी इतका किंवा त्यापेक्षा मोठाही असतो . आजूबाजूला चिंच आंबा अशा गर्द वृक्षांची लागवड करतात जेणेकरून सावलीमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होतं . त्याच सोबत या पानांचा खच पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतो आणि बाष्पीभवन कमी करतो . भेंड आणि करंज यासारख्या झुडप वर्गीय वनस्पती माती घट्ट धरून ठेवतात जेणेकरून पाण्यासोबत माती बावखळाच्या आत जाणार नाही . ( माहिती सौजन्य : श्री सचिन मर्ती . )
विहीरीशी तुलना केल्यास विहीर ही गोलाकार असते आणि तिचा व्यास कमी असतो . विहीरीच्या कडा दगड विटांनी पक्क्या बांधलेल्या असतात . पावसाचं पाणी विहीरीत झिरपावं अशी अपेक्षा नसते . उलट तळाशी असलेले नैसर्गिक झरे पाण्याची पातळी ठरवतात . पाणी पिण्यासाठी वापरतात त्यामुळे आजूबाजूला झाडांची लागवड करत नाहीत . कारण झाडांची पानं पाण्यात पडून पाण्याची गुणवत्ता खराब होते .
चित्र क्र . २ .बावखळ, सभोवतालची झाडं, मध्यभागी रहाटाची सुविधा .
चित्र क्र . ३ . बावखळा भोवतीची सावली साठी लावलेली झाडं .
चित्र क्र . ४ . बावखळाभोवतीची झुडूपं
स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती : -
स्वातंत्र्य पूर्व काळात अनेक कुटूंबांचं मिळून एक बावखळ असे . प्रत्येक कुटूंब त्याचा आलटून पालटून वापर करत असे . बैलजोडी आणि रहाटाचा वापर पाणी उपसण्यासाठी केला जाई . रहाटाला मातीची मडकी जोडली जात , आणि त्यांची रचना अशी असायची की त्यातून थोडंसं पाणी पुन्हा बावखळात परत जाई . तसंच बैलजोडी वापरल्याने बैलांच्या क्षमतेनुसार पाणी उपसा होत असे . दिवसातून ८ तास काम केल्यावर बैलांनाही आराम दिला जाई . त्यामुळे पाणी उपसा नियंत्रित प्रमाणात होई आणि खाली गेलेली पाण्याची पातळी उरलेल्या सोळा तासांच्या कालावधीत पूर्ववत होत असे . बाहेर पडलेलं पाणी लहान चर खोदून शेतांपर्यंत पोहोचवलं जाई .
सध्याची परिस्थिती : -
गेल्या पंचावीसेक वर्षांत वसई विरार नगरपालिका आणि आजच्या घडीला महानगरपालिकेने बरीच धरणं बांधली आणि घरोघरी नळाने पाणी पुरवठ्याची सोय केली . तसंच ह्या भागात झालेल्या आर्थिक आणि सामाजिक सुधारणांमुळे इथल्या तरुणाईला परदेश आणि तिथलं जीवनमान आकर्षित करू लागलं. त्यामुळे पारंपारिक शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ लागलं . जमिनींना सोन्याचे भाव आले आणि बावखळ जमिनीचा बराचसा भाग व्यापत असल्यामुळे त्यांना बुजवून नवीन इमारती आणि नवीन घर बांधण्याकडे लोकांचा कल वाढला .
औद्योगिकरण आणि यांत्रिकीकरणामुळे बैलांची जागा मोटरनी घेतली . त्यामुळे दिवसाच्या कोणत्या वेळेत आणि किती पाणी उपसा करायचा यावर बंधन उरलं नाही . परिणामी जवळ असलेल्या समुद्राचं खारट पाणी बावखळात जमिनी खालच्या झऱ्यांमधून शिरू लागलं. पाण्याची आणि जमिनीची गुणवत्ता बिघडली . काही बावखळं तर आज बेवारस पणे पडून आहेत . त्यांत कचरा घाणीचं साम्राज्य आहे . फक्त काहीच बावखळं अशी आहेत ज्यांचा आजही सिंचना साठी वापर होतो . ती बर्यापैकी सुस्थितीत आहेत ( चित्र क्रं. २, ३, ४ ) .
चित्र क्र. ५ . बावखळांची दुर्दशा .
पृथिव्यां त्रीणि रत्नानी जलमन्नं सुभाषितं ।
मुढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥
अर्थात पृथ्वीवर तीनच रत्न आहेत . जल अन्न आणि सुभाषित ! पण मुर्ख लोक दगडाच्या तुकड्याला रत्न संज्ञेने ओळखतात .
लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार .
टिप्पण्या