॥ श्री गणेशाय नमः ॥
छत्रपती शिवाजी महराजांची जन्मभूमी म्हणून नावलौकिकास आलेलं जुन्नर हे तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. जुन्नरला सातवाहन काळापासूनचा इतिहास आहे जो इसवी सन पूर्व २५० म्हणजेच आज पासून सुमारे २२०० वर्ष मागे जातो. सातवाहनांच्या समकालीन क्षत्रप राज्यकर्त्यांची ही राजधानी होती. बावीसशे वर्षापूर्वी मोसमी वाऱ्यांचा शोध लागल्यावर भारतातून रोम , ग्रीस इ देशांशीपण व्यापार सुरु झाला. त्या काळी नाला सोपारा ( शूर्पारक ) , कल्याण ( कलिअणस ), भरूच ( भरुकच्छ ) , चौल इ. बंदरांमधून व्यापार चालत असे. या बंदरांमधून आणलेला माल नाणेघाटातून जुन्नर मार्गे पैठणला म्हणजेच सातवाहनांच्या राजधानीत पोहोचवला जाई. डोंगर फोडून आणि दगडांत बांधलेला नाणेघाट हा सर्वात प्राचीन व्यापारी मार्ग आहे.
शिवनेरी , तुळजा आणि गणेश लेण्यांच्या डोंगरसमूहाच्या कुशीत वसलेलं जुन्नर ज्याच्या ताब्यात, व्यापारी मार्ग त्यांच्या ताब्यात हे सुस्पष्ट समीकरण होतं. त्यामुळे जुन्नर आणि नाणेघाटावर ताबा ठेवण्यासाठी क्षत्रप आणि सातवाहनांमध्ये नेहमी संघर्ष चालू असे. पण ह्या अश्या राजकीय परिस्थितीतही जुन्नर स्वतःची धार्मिक ओळख टिकवून होतं ते म्हणजे शहरभर पसरलेल्या लेण्यांमधून !
सर्वसाधारणतः ही सर्व लेणी हिनयान पंथीयांची आहेत. गौतम बुद्धांनी केलेल्या उपदेशात मूर्ती पूजा वर्ज्य होती. कालांतराने मूर्ती पूजेचं महत्व पटल्याने मूर्ती पूजा मानणारे बौद्ध भिख्खू स्वतःला महायान म्हणवू लागले आणि मूर्ती पूजा न मानणारे हीनयान पंथात गणले जाऊ लागले. हिनयान लेणी ही अगदी साधी असतात. वर्षभर धर्मप्रचारासाठी फिरणाऱ्या भिख्खूंना पावसाच्या काळात राहाण्याची सोय म्हणून ह्या लेण्या खोदल्या गेल्या. हीनयान लेण्यांमध्ये नेहमी आढळणाऱ्या गोष्टी म्हणजे चैत्यगृह, विहार , पाण्याच्या टाक्या आणि स्तूप ! विहार म्हणजे भिख्खूंच्या राहण्याच्या खोल्या ! हिनयान पंथाने मूर्तिपूजा नाकारली होती तरी मन एकाग्र करण्यासाठी भौतिक वस्तूची गरज होती आणि म्हणून बुद्ध किंवा त्यांच्या समतुल्य व्यक्तीचे केस, उपरणं, अस्थी किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तू जसं की वस्त्र ,वाडगा इ. ठेवून त्याभोवती दगडी स्मारक घडवलं जाई त्याला स्तूप म्हणत. त्याभोवती प्रदक्षिणा पथ आणी भिख्खूंच्या वावरण्याची सोय म्हणून भली मोठी खोली घडवली जाई त्याला चैत्यगृह म्हणतात. हिनयान लेण्यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्यात बुद्धाची मूर्ती जरी आढळत नसली तरी इतर काही शिल्पं आढळतात जसं की दान देणारी माणसं, द्वारपाल , हत्ती , नाग इत्यादी प्राणी. लेण्या डोंगरमाथ्यावर कोरल्या जात नाहीत. त्यासाठी मुख्य कारण म्हणजे वारा पावसापसून वाचण्यासाठी त्या कोरल्या जात. दुसरं कारण वर राहणाऱ्यांना पायथ्याशी असलेल्या गावाशी संबंध ठेवावा लागे. तिसरं कारण डोंगर माथ्यावरून आलेलं पावसाचं पाणी हे टाक्यांमधे आपोआप साठवता येई.
जुन्नर मध्ये १८० पेक्षा जास्त लेण्या आढळतात. एखाद दुसरं लेणं सहसा आढळत नाही. आजूबाजूची पाच पंधरा लेणी मिळून त्यांचा एक समूह असतो आणि त्या समूहाला विशिष्ट नावाने संबोधलं जातं. जुन्नर मध्ये लेण्यांचे मुख्य ४ समूह आहेत ते खालीलप्रमाणे :
१) शिवनेरी लेणी समूह
२) मानमोडा लेणी समूह
३) गणेश लेणी समूह
४) तुळजा लेणी समूह
१) शिवनेरी लेणी समूह
ह्या लेण्या शिवनेरी किल्याच्या अगदी खालोखाल वसलेल्या आहेत. गड चढून गेल्यावर शिवाई देवी मंदिराच्या उजवीकडे खाली पायऱ्या उतरून गेल्यावर दृष्टिस पडतात. बर्याचश्या लेणी , पाण्याच्या टाक्या , लहानसा स्तूप, सुंदर सुबक आणि आखीव रेखीव असे ब्राम्ही लिपीतले शिलालेख आणी समोर दिसणाऱ्या मीना नदीवर बांधलेल्या धरणाचं विहंगम दृश्य दिसतं .

चित्र क्र . १ . शिवनेरी लेण्यांमधून दिसणारं जुन्नर शहर आणि उजवीकडे भिंतीवर कोरलेला शिलालेख .
चित्र क्र . २ शिवनेरी लेणी बाहेरील भाग
चित्र क्र . ३ . शिवनेरी लेण्यांमधील स्तूप
२) मनमोडा लेणी समूह
मनमोडा लेणी समूह हा अंबिका, भीमाशंकर, आणि भूतलिंग / भूतलेणी ह्या तीन उपसमूहांपासून बनलेला आहे. लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या मुख्य रस्त्याने वर आल्यानंतर अंबिका लेण्यांचे दर्शन होतं. अंबिका लेणी ही दोन मजली असून प्रशस्त आवारात सामावलेली आहेत. वरती चढून जाण्यासाठी जिने चैत्यगृह विहार आणि मधोमध स्तूपाची रचना आढळून येते .अंबिका लेण्यांच्या समोर प्रशस्त पटांगण आहे. अंबिका लेण्यांकडे पाहिल्यास उजवीकडे भूत लिंग आणि डावीकडे भीमाशंकरची लेणी आहेत. हे तिन्ही लेणी समूह जवळपास एकाच उंचीवर असून एकमेकांपासून थोडे दूर विखुरलेले आहेत. सदर लेण्यांमध्ये विहार, चैत्यगृह आणि पाण्याची टाकी आढळून येतात.
चित्र क्र. ६ . अंबिका लेण्यांसमोरील प्रशस्त अंगण
मनमोडा लेण्यांमधला दुसरा उपसमूह म्हणजे भूत लिंग किंवा भूत लेणी. यामध्ये चित्र क्रमांक सात मध्ये दाखवल्याप्रमाणे एक प्रशस्त चैत्यगृह दिसतं ज्यामध्ये आजही त्याकाळी बांधलेला स्तूप अगदी सुस्थितीत आढळतो. दरवाजावरील शिल्पकाम अगदी वाखण्याजोगे आहे. द्वारपाल, वेदिका पट्ट, दारावरची कमान , त्यात मधोमध देवीचं शिल्प, त्याच्या बाजूची हत्तीची शिल्प सहजपणे लक्ष वेधून घेतात. भूत लिंग लेण्यांचे हे प्रवेश द्वार अभ्यासकांचं लक्ष वेधून घेतं. या लेणी समूहातली बाकीची काही लेणी दगडाचा प्रस्तर खराब निघाल्यामुळे अर्धवट सोडून देण्यात आली.
चित्र क्र. ७ . भूतलिंग लेण्यांमधील चैत्यगृहाचे प्रवेशद्वार
चित्र क्र. ८ . भूतालिंग लेण्यांच्या प्रवेशद्वाराची कमान आणि त्यावरील गजशिल्पं .
अंबिका लेण्यांच्या डावीकडे गेलेल्या रस्ता भीमाशंकर लेण्यांना जाऊन पोहोचतो. भीमाशंकर लेणी स्थापत्यकलेत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इतर लेण्यांप्रमाणेच यातही सभामंडप चैत्यगृह विहार आणि पाण्याच्या टाक्या आढळतात. लेण्यांच्या आत मध्ये पुरेसा उजेड येण्यासाठी खोदलेली गवाक्ष म्हणजेच लहान झरोकेही दिसून येतात. या लेण्यांमध्ये काही शिलालेख झिजलेल्या अवस्थेत आढळतात.
चित्र क्र. ९ . भीमाशंकर लेणी
चित्र क्र . १० . भीमाशंकर लेण्यांमधील पाण्याची टाकी
जुन्नर मध्ये लेण्यांवर आढळून येणाऱ्या शिलालेखांमध्ये मुख्यत्वे त्या काळाच्या लोकांची नावे तसेच ते करत असलेल्या व्यापारांची नावे आढळून येतात. लेखांची लिपी ब्राह्मी असून भाषा प्राकृत आहे. सर्वसाधारणतः धनिक व्यापारी किंवा तत्कालीन राज्यकर्त्यांनी दिलेल्या दानाचा उल्लेख हा शिलालेखांमध्ये असतो. सदर लेणी खोदण्यासाठी किंवा पाण्याची टाकी खोदण्यासाठी ज्या धनिकाने दान दिलं त्यांचा उल्लेख त्या त्या शिलालेखांमध्ये केला जातो. शिलालेख आढळण्याची सर्वात मुख्य जागा म्हणजे व्हरांडा आणि पाण्याच्या टाक्यांच्या वरची बाजू. जुन्नरच्या ह्या लेण्यांमध्ये एकूण सदतीस शिलालेख आढळून येतात. शिलालेख हे इतिहास जाणून घेण्याचं एक विश्वसनीय साधन आहे. त्यामुळेच त्यांची जपणूक करणे हे आपलं कर्तव्य आहे !
संदर्भ : Junnar Inscriptios, डॉ. शोभना गोखले.
गणेश लेणी आणि तुळजा लेण्यांबद्दल माहीतीसाठी दुसरा भाग येईल. त्यासाठी संपर्कात राहा. वेबसाईट वरील " Follow Us" बटनावर क्लिक करा. किंवा rahulabhyankar5@gmail.com वर ई-मेल करा .
लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार .
टिप्पण्या
Devshree Ugvekar