मुख्य सामग्रीवर वगळा

गणरायाचं खरं रूप: शास्त्र, संस्कृती आणि पर्यावरणपूरक मूर्ती !

 ||  श्री गणेशाय नम:  ||

" अरे राहुल ! गणपतीचे डोळे कधीही सरळ एका रेषेत आणि आडवे नसतात. गणपती हे गजवक्त्र म्हणजे हत्तीचे तोंड/मुख असलेली देवता आहे. आणि हत्तीचे डोळे तिरके असतात. तुम्ही मुंबईकरांनी स्वतःला वाट्टेल तसा गणपती घडवलात. त्याला उगाचच मानवी स्वरूप दिलंत. माणसासारखे सरळ आणि आडवे डोळे असल्यामुळे तो गणपती माणसासारखा दिसतो आणि त्यामुळे कदाचित तो तुम्हाला लोभस वाटतो. पण हि प्रथा बरी नव्हे. " इति नंदा आजोबा. 

कैक वर्षांपूर्वी मी आमच्या मूळ गावी ( मिरज ) गेलो होतो. मी सुध्दा कैक वर्ष विरारच्या  गणपतीच्या कारखान्यात काम शिकत होतो. सहज म्हणून गावच्या कारखान्यात एक चक्कर मारली. सर्व गणपती थोडे वेगळे दिसले. आमच्या मुंबईत नाही असं बनत, तुमच्याकडचे साचे थोडे वेगळे आहेत. त्यावर नंदा आजोबांनी मला हे उत्तर दिलं. मुळातच तेव्हा माझी गणपती आणि मूर्ती शास्त्राबद्दलची जाण तशी बेताचीच असल्यामुळे तो विषय मग अलगद मागे पडला. पण कालांतराने मी ह्या मूर्तिशास्त्राचाअभ्यास सुरु केल्यावर मला आजोबा काय म्हणत होते ते स्पष्टपणे उलगडू लागले.

अजून खोल खोल शोध घ्यायला सुरु केला तेव्हा समजले कि आज आपण जो गणेशोत्सव साजरा करतोय त्यात मूळ गणपतीचे स्वरूप बऱ्यापैकी वेगळे आहे. ह्याला दोषी कोण ? तर एक म्हणजे मूर्तिकार आणि दुसरा त्याच्याकडून घेणारा ग्राहक. कारण मी बनवतोय ते खपतंय हा मूर्तिकाराचा दृष्टिकोन आणि मूर्ती कलेबद्दल मी भाष्य नाही करत पण मूर्ती शास्त्राबद्दल जवळ जवळ प्रत्येक ग्राहकांचं कमालीचं औदासिन्य ! ते किमान दूर व्हावं म्हणून हा लेख प्रपंच. 

कोणत्याही देवतेची मूर्ती कशी असावी हे समजून घेण्यासाठी सर्वात सोप्पं उपाय म्हणजे त्या देवतेची स्तोत्र किंवा त्याची स्तुती करणारी गीतं, ओव्या, कविता इत्यादी गोष्टींकडे नीट नजर टाकली तरी त्याच मूळ स्वरूप नीट कळून येईल. ह्यात मी गणपतीचं स्वरूप समजण्यासाठी अथर्व शीर्ष आणि नारदांनी रचलेले " प्रणम्य शिरसा देवम " ह्या दोन स्तोत्रांचा आधार घेऊन श्रीगणेशा करूया. 


चित्र क्र. १ गणपतीची यथार्थ मूर्ती, चेन्नकेशवा मंदिर, बेलूर, कर्नाटक.


सर्व प्रथम अथर्वशीर्ष


  • एकदन्तञ् ( गणपती एकदंत आहे. परशुरामासोबतच्या लढाईत परशुरामाने त्याचा एक दात तोडला अशी आख्यायिका आहे .)
  • चतुर्हस्तम्, ( चार हात आहेत )
  • पाशमङ्कुशधारिणम् । ( एका हातात पाश आणि दुसऱ्या हातात अंकुश आहे. )

देवतांच्या आयुधांचं खूप महत्व आहे. आजच्या काळात कौशल्याची कामे करणारी मंडळी स्वतःची हत्यारे घेऊन फिरतात. कारण त्याशिवाय त्यांचं काम होऊच शकत नाही हे त्यांना ठाऊक असत. जसं कि नळ दुरुस्त करायला माणूस बोलवावा आणि त्याला गवंड्याची हत्यारे देऊन कामाला लावलं तर तो हातावर हात ठेवून बसूनच राहणार. त्यामुळे देवतेच्या बाबतीत पण आयुधांची निवड सजगपणे करावी. आपल्याला गणपती कडून काय अपेक्षित आहे ते ध्यानात आणून त्याची आयुधे निवडावीत. सोबतीने हेही लक्षात घ्या, संध्याकाळी घरी आल्यावर जशी लेकरं बाबांभोवती पिंगा घालतात कि त्यांनी काहीतरी खाऊ किंवा भेट आणली असेल, तसंच ह्या देवताही सोबतीने काही ना काही आणतातच. 

गणपतीची निरनिराळी आयुधे पाहुयात.

  • पाश - म्हणजे दोरीने बनवलेला फास, ह्याचा उपयोग एखाद्याला पकडून जखडून ठेवायला होतो. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या भक्तांना देव पकडून ठेवतो आणि सन्मार्गाला लावतो. 

चित्र क्र. २  पाश - आयुध ( सौजन्य - विकिपीडिया )


  • अंकुश - भला मोठ्ठा हत्ती, केवळ एका अणकुचीदार अंकुशाने नियंत्रित करता येतो. गणपती बुद्धीची देवता असल्याने ज्यांना अभ्यासात आणि बुद्धीच्या क्षेत्रात प्रगती करायची असेल त्यांनी अंकुश असलेली मूर्ती निवडावी.



चित्र क्र ३. अंकुश , मेहरानगड फोर्ट शस्त्र संग्रहालय, राजस्थान .

  • कमळ - हे कोमलता, शुद्धता, मांगल्य आणि पावित्र्य दर्शवते. 
  • परशु - समोर आलेल्या विघ्नाशी लढताना परशुचा वापर होतो. लक्षात घ्या पाश, कमळ आणि अंकुश हे नियमन करण्यापुरते आहेत, तथापि परशु हे विघ्न संहारक आयुध आहे. निर्विघ्नतेसाठी परशु.
  • त्रिशूळ - शिवसुत म्हणजे शंकराचा मुलगा, त्यामुळे स्वाभाविकत: त्याच्या वडिलांकडून मिळालेले हे आयुध. हे दुरून फेकून मारता येण्यासारखे असते. परशु सहसा हातातच बाळगून युद्ध लढावे लागते. दोन्हीतला भेद लक्षात घ्यावा.
  • धनुष्य बाण - अत्यंत क्वचित प्रसंगी गणपतीच्या धनुष्य बाणासोबतच्या मूर्ती सापडतात. 

रदञ् च वरदम् हस्तैर्बिभ्राणम्, ( एका हातात तुटलेला हस्तिदंत - ह्याच्या साहाय्याने गणपतीने महाभारत लिहिले अशी आख्यायिका आहे, उजवा हात वरदमुद्रेत ( आशीर्वाद देताना ) आहे. )

मूषकध्वजम् । ( ज्याच्या ध्वजावर मूषक म्हणजे उंदीर आहे - पूर्वी देवता येण्यापूर्वी तिचा ध्वज आणि ध्वज वाहक आधी येत असे, जेणेकरून उपस्थितांना कल्पना यावी कि कोण येत आहे. सोबतीनेच उंदीर हे गणपतीचे वाहनहि आहे. )

रक्तं लम्बोदरं, ( रक्तम म्हणजे लाल रंगाचा, लम्बोदरं म्हणजे ज्याचे पोट मोठे आहे, सुटलेले आहे )

शूर्पकर्णकम् रक्तवाससम् । (हत्ती सारखे सुपासारखे मोठ्ठे कान, ज्याची वस्त्रे लाल आहेत )

रक्तगन्धानुलिप्ताङ्गम्, ( ज्याचे शरीर लाल गंधाने लिप्त आहे )

रक्तपुष्पैःसुपूजितम् । ( ज्याला लाल फुले प्रिय आहेत )

इति अथर्वण वाक्यम

आता नारदांनी लिहिलेले प्रणम्य शिरसा देवम, ह्यात त्यांनी गणपतीची १२ नावे सांगितली आहेत. 

  1. वक्रतुंड - वाकडी सोंड 
  2. एकदंत - एक दात असलेला
  3. कृष्णपिंगाक्ष - ( गडद तपकिरी डोळ्यांचा )
  4. गजवक्त्रंहत्तीचे मुख असणारा 
  5. लंबोदर - मोठ्ठे, सुटलेले पोट असणारा 
  6. विकटमेव - विराट स्वरूप असणारा
  7. विघ्न राजेंद्र - सर्व विघ्नांचा अधिपती, विघ्न दूर करणारा.
  8. धुम्रवर्ण - गडद राखाडी रंगाचा 
  9. भालचंद्र - डोक्यावर चंद्र धारण करणारा 
  10. विनायक - विघ्न हर्ता
  11. गणपती - सर्व गणांचा अधिपती
  12. गजाननहत्तीचे मुख असणारा 

ह्यात १,२,३,४,५,८ आणि १२ क्रमांकाच्या नावातून गणेशाच्या रूपाचे आकलन करता येऊ शकते. 

इति नारद उवाच 

आता आपण वरील दोन स्तोत्रातून राहिलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ.

१. गणपतीचा मूळ जन्म यक्ष  - पार्वतीच्या मळापासून उत्पन्न झालेला यक्ष, ज्याला पार्वतीने स्नानाला जाताना दारावर राखणदार म्हणून योजिले. यक्ष हि देवांची सहाय्यक जमात आहे. यक्ष हे सहसा ठेंगणे आणि आखूड बांध्याचे असतात. मानवी शरीराशी तुलना करता ते पूर्णपणे वेगळे दिसून येतात. ह्या एका संदर्भाने गणपती हा लंबोदर आहे, सोबतच त्याचे पाय आखूड आहेत. 

२. पोटावरील सर्प / सर्पयज्ञोपवीत ( सापाचे जानवे ) - जुन्या मूर्तींचा अभ्यास केल्यास प्रत्येक मूर्तीच्या पोटावर सर्प आढळून येतो, काही ठराविक ठिकाणी सर्पयज्ञोपवीतहि आढळून येते. 



गणपतीला ट्रेंड प्रमाणे काहीना काही वेगळे स्वरूप द्यायची प्रथा सुरु आहे. खास करून TV वरील मालिकांमध्ये जे सुरु असेल ते ! पहा, गणपती वर्षातून एकदाच घरी येतो, त्याला आणताना आपली संस्कृती आणि शास्त्राची सांगड घालूनच आणा. सोबतीने ज्या वातावरणात श्वास घेताय, ज्यातून अन्न मिळतंय, त्याचाहि आदर हा सण साजरा करताना करा. आपलाच आणलेला देव आपली महानगरपालिका विसर्जन करायला देत नाही कारण तो गणपती POP चा आहे म्हणून ? मग ह्यात सुज्ञ कोण असलं पाहिजे ? बाप्पाच्या विसर्जनाची परवानगी न्यायालयाकडून आणावी लागतेय हे काही बरं नाही. हा लेख वाचल्या नंतर तरी मनाची उदासीनता झटकून टाका आणि मूर्ती निवडताना सजग राहा हीच सर्वांना विनंती !


आजच्या काळात अश्या मूर्ती कुठे मिळत नाहीत, असं वाटत असेल तर '७३९१९८८४७" ह्या whatsapp क्रमांकावर "शास्त्रोक्त गणपती" असे लिहून कळवा. आम्ही स्वतः कॉल बॅक करू. अथवा abhyankar_rv  ह्या इंस्टाग्राम अकाउंटला DM करा.

आमच्याकडे पर्यावरण पूरक मातीच्या मूर्ती उपलब्ध आहेत. 

आमच्या मूर्तींची ठळक वैशिष्ट्ये :- 

  • पर्यावरण पूरक लाल / शाडू मातीच्या मूर्ती
  • १००% पर्यावरण पूरक रंगातली मूर्ती ( केवळ लाल - पांढरा रंग) 
  • रंगीबेरंगी मूर्ती सुध्दा मिळेल पण तिचे रंग हे पर्यावरण पूरक नसतात हे ध्यानात घ्या. 
  • आयुधांची निवड तुम्ही करा  - परशु, पाश, अंकुश, कमळ, त्रिशूळ. 
  • उंची ११ इंच, लांबी १० इंच, रुंदी ८ इंच.
  • हत्ती सारखे तिरके डोळे 
  • हवे असल्यास - उजव्या हातात तुटलेला हस्तिदंत, पोटावर सर्प.


लोभ असावा. 
राहुल अभ्यंकर, विरार. 

टिप्पण्या

Shailendra._ म्हणाले…
While reading, I came to know some such facts which I had thought about but never got answers to them like the things shown in the hands of Ganesh ji, whether it is rope or the creation of eyes. It gives us such information which along with connecting us with our God, we can also keep in mind the environment.
beautifully explained.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी ॥ श्री गणेशाय नमः ॥ भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .  चित्र क्रमांक १ . जलदुर्ग अर्नाळा येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प . चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया . विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे...

रावणानुग्रह - शिवमूर्तये नम: !

हर हर महादेव  प्राचीन मंदिरांची विविध उप अंगे आहेत. त्यातलं सर्वात लक्षणीय अंग म्हणजे मंडोवर म्हणजेच मंदिराची बाह्य भिंत. ह्या बाह्य भिंतीवर मंदिराच्या आतल्या देवते सोबतच्या इतर उप देवता , त्या मुख्य देवतेचे अवतार कार्य , काही प्रसंगी रामायण, महाभारत इत्यादी पौराणिक कथांचे , युद्ध प्रसंगांचे शिल्प किंवा शिल्प पट आढळतात. सर्वात जास्त शंकर आणि विष्णूची देवळं आढळतात आणि जो देव मुख्य गाभाऱ्यात स्थापित असेल, त्याची शिल्पं जास्त आणि दुसऱ्याची काही मोजकी शिल्पं ह्या बाहय भिंतीवर आढळतात. त्यातली सर्वात आकर्षक आणि नित्य आढळणारी मूर्ती म्हणजे रावणानुग्रह ! आकर्षक ह्यासाठी की सदर मूर्तीमध्ये अनेक रसांचं वर्णन आहे जसं की वीर, करुणा,शृंगार, भय इत्यादी ! हे सर्व रस आणि कैलास पर्वत, शिवाचे गण, दास, दासी, नंदी इत्यादी दाखवताना मूर्तिकाराच्या कौशल्याचा कस लागतो. मंदिरात आढळणाऱ्या या बऱ्याच मूर्ती एकमेव शिल्प नसून अनेक शिल्पांचा शिल्पपट असतो. शिल्पपट समजण्याकरता त्याची मूळ कहाणी माहीत असावी लागते आणि त्या मूळ कहाणीचा आधार घेत संपूर्ण शिल्पाची कल्पना सहज करता येते. रावणानुग्रह या शिल्पाची कहाणी : - ए...