॥ हर हर महादेव ॥
ऋषीचे कूळ आणि नदीचं मूळ कधी शोधू नये असं म्हणतात . पण भारतात नद्यांना मातृत्वाचं स्थान दिलं जातं आणि त्यांच्या उगमाशी संबंधीत मंदिरही उभारली जातात हे विशेष . असंच एक सुंदर मंदिर रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीत आहे ज्याचं नाव आहे अमृतेश्वर महादेव मंदिर आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवळातून प्रवरा नदी उगम पावते असं जाणकार सांगतात .
चित्र क्रमांक १ . अमृतेश्वर महादेव मंदिर , रतनवाडी, भंडारदरा .
चित्र क्रमांक २ . जलमग्न शिवलिंग , अमृतेश्वर महादेव .
चित्र क्रमांक दोन मध्ये शिवलिंग पाण्यात बुडालेलं दिसतं . सर्वसाधारण पणे चारेक महिने ते पाण्यातच असतं . ह्याच संदर्भाने प्रवरा नदी इथून उगम पावते असं म्हणतात .
चित्र क्रमांक ३ . अमृतेश्वर मंदिराची बारव ( पॅनारोमा ) .
बारव म्हणजे पायविहीरीच . पण त्यांच जलव्यवस्थापन आणि स्थापत्य अगदी शास्त्रशुद्ध . मंदिराचा कळस जसा आसमंतात निमुळता होत जातो तशीच बारवही जमिनीत खोल जाताना निमुळती होते म्हणून त्यांना उपडी मंदिरे ( inverted temples ) सुद्धा म्हटलं जातं . बारा महिने पूर्ण गावाला पाणी पुरवठा व्हावा अशा पद्धतीचं जल व्यवस्थापन आणि जलाशयाचं पावित्र्य टिकावं ( बारव मंदिराशेजारी असल्यास त्या पाण्याचा उपयोग खास करून देवळातल्या नित्यकर्मां साठीच केला जाई )म्हणून केलेले नियम, देवकोष्ठांमध्ये अनेकविध देवांची स्थापना हे बारवांचं वैशिष्ट्य सांगता येईल .
बारवांचं पावित्र्य जपण्यासाठी त्यात देवकोष्ठांची योजना केली जात असे . देवकोष्ठ म्हणजे दगडात कोरलेले लहानसे कोनाडे ज्यात ह्या देवतांच्या मूर्ती सुप्रतिष्ठीत केलेल्या असतात . ह्यात सर्वांत महत्वाचा देव म्हणजे शेषशायी विष्णू , गणपती आणि ११ रुद्रांची स्थापना .
मूर्तीला शेंदूर फासल्याने त्याचे बारकावे कळून येत नाहीत पण स्वतंत्र देवकोष्ठ, हातातले पाश आणि परशू ही आयुधं, आखूड मांड्या, सापाचं जानवं इत्यादि मूर्ती विशेष दिसून येतात . देवकोष्ठाच्या बाहेर द्वारपालही नजरेस पडतात .
चित्र क्रमांक ५ .बारवेतील शेषशायी विष्णू मूर्ती, सोबत पायाशी लक्ष्मी, बाहेर सालंकृत द्वारपाल इत्यादी .
श्री विष्णुची मूर्ती आणि बारवेचा निकट संबंध आहे . जलाशय म्हणजे पाणी आणि श्रीविष्णू क्षीरसागरात म्हणजेच पाण्यात शेषनागावरती झोपतात म्हणून बारव असल्यास त्यात शेषशायी विष्णू मूर्ती प्राधान्याने आढळून येते .
गणपती आणि विष्णू शिवाय इतर अकरा देव कोष्ठां मधे ११ रुद्रांची स्थापना केलेली दिसते . बाहेर द्वारपाल आणि यक्षांच्या सालंकृत मूर्त्या दिसतात . ह्या बारवेमध्ये सर्व रूद्रांच्या मूर्त्या साधारणपणे सारख्याच दिसतात . काळाच्या ओघात भरपूर झीजही झालेली दिसते.
चित्र क्रमांक ७ . आयुधांवरून मूर्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न
मूर्तींच्या उजव्या हातात सर्वप्रथम गदा दिसते मग वरच्या उजव्या हातात सुदर्शन चक्र मग वरच्या डाव्या हातात शंख आणि खालच्या डाव्या हातात अस्पष्ट पणे कमळ दिसते. गचपश म्हणजे गदा, चक्र, शंख आणि पद्म तर अग्निपुराण, पद्मपुराणा प्रमाणे ही माधवाची ( विष्णूचीच ) मूर्ती आहे हे स्पष्ट होते .
संदर्भ : - मूर्ती विज्ञान , डॉ . गणेश हरि खरे .
चित्र क्रमांक ८ . बारव आणि त्यातली समृद्ध जैव विविधता
मानवासोबतच इतरही जीव बारवांशी जोडलेले असतात . सर्वात महत्त्वाचे म्हणजे कासव आणि मासे . आणि त्यांच्यावर गुजराण करणाऱ्या पक्ष्याचं खंड्याचं ( King Fisher ) हे छायाचित्र .
अतिरिक्त माहिती आणि छायाचित्रांसाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा.
लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार.
टिप्पण्या
आणि स्थापत्यशास्त्र तर अप्रतिम, अद्वितीय होतंच. तुझा अभ्यास असाच सुरु राहो, अनेक आशीर्वाद!
@ ठाकूर मॅडम, खूप खूप धन्यवाद ! असेच आशिर्वाद असू द्या . आपला कृपाभिलाषी 🙏
Keep on doing such creative work.
Great going👍🏻