मुख्य सामग्रीवर वगळा

बारव - प्राचीन जलव्यवस्थापन तंत्रज्ञान (श्री अमृतेश्वर महादेव , रतनवाडी, भंडारदरा )

॥ हर हर महादेव ॥

ऋषीचे कूळ आणि नदीचं मूळ कधी शोधू नये असं म्हणतात . पण भारतात नद्यांना मातृत्वाचं स्थान दिलं जातं आणि त्यांच्या उगमाशी संबंधीत मंदिरही उभारली जातात हे विशेष . असंच एक सुंदर मंदिर रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीत आहे ज्याचं नाव आहे अमृतेश्वर महादेव मंदिर आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवळातून प्रवरा नदी उगम पावते असं जाणकार सांगतात .



चित्र क्रमांक १ . अमृतेश्वर महादेव मंदिर , रतनवाडी, भंडारदरा .

चित्र क्रमांक २ . जलमग्न शिवलिंग , अमृतेश्वर महादेव .

चित्र क्रमांक दोन मध्ये शिवलिंग पाण्यात बुडालेलं दिसतं . सर्वसाधारण पणे चारेक महिने ते पाण्यातच असतं . ह्याच संदर्भाने प्रवरा नदी इथून उगम पावते असं म्हणतात .

चित्र क्रमांक ३ . अमृतेश्वर मंदिराची बारव (  पॅनारोमा ) .

बारव म्हणजे पायविहीरीच . पण त्यांच जलव्यवस्थापन आणि स्थापत्य अगदी शास्त्रशुद्ध . मंदिराचा कळस जसा आसमंतात निमुळता होत जातो तशीच बारवही जमिनीत खोल जाताना निमुळती होते म्हणून त्यांना उपडी मंदिरे ( inverted temples )  सुद्धा म्हटलं जातं . बारा महिने पूर्ण गावाला पाणी पुरवठा व्हावा अशा पद्धतीचं जल व्यवस्थापन आणि जलाशयाचं पावित्र्य टिकावं ( बारव मंदिराशेजारी असल्यास त्या पाण्याचा उपयोग खास करून देवळातल्या नित्यकर्मां साठीच केला जाई )म्हणून केलेले नियम, देवकोष्ठांमध्ये अनेकविध देवांची स्थापना हे बारवांचं वैशिष्ट्य सांगता येईल . 

बारवांचं पावित्र्य जपण्यासाठी त्यात देवकोष्ठांची योजना केली जात असे . देवकोष्ठ म्हणजे दगडात कोरलेले लहानसे कोनाडे ज्यात ह्या देवतांच्या मूर्ती सुप्रतिष्ठीत केलेल्या असतात . ह्यात सर्वांत महत्वाचा देव म्हणजे शेषशायी विष्णू , गणपती आणि ११ रुद्रांची स्थापना . 


चित्र क्रमांक ४ . बारवेतली गणेश मूर्ती .

मूर्तीला शेंदूर फासल्याने त्याचे बारकावे कळून येत नाहीत पण स्वतंत्र देवकोष्ठ, हातातले पाश आणि परशू ही आयुधं, आखूड मांड्या, सापाचं जानवं इत्यादि मूर्ती विशेष दिसून येतात . देवकोष्ठाच्या बाहेर द्वारपालही नजरेस पडतात . 


चित्र क्रमांक ५ .बारवेतील शेषशायी विष्णू मूर्ती, सोबत पायाशी लक्ष्मी, बाहेर सालंकृत द्वारपाल इत्यादी .

श्री विष्णुची मूर्ती आणि बारवेचा निकट संबंध आहे . जलाशय म्हणजे पाणी आणि श्रीविष्णू क्षीरसागरात म्हणजेच पाण्यात शेषनागावरती झोपतात म्हणून बारव असल्यास त्यात शेषशायी विष्णू मूर्ती प्राधान्याने आढळून येते .


चित्र क्रमांक ६ . ११ रुद्रापैकी एक मूर्ती

गणपती आणि विष्णू शिवाय इतर अकरा देव कोष्ठां मधे ११ रुद्रांची स्थापना केलेली दिसते . बाहेर द्वारपाल आणि यक्षांच्या सालंकृत मूर्त्या दिसतात . ह्या बारवेमध्ये सर्व रूद्रांच्या मूर्त्या साधारणपणे सारख्याच दिसतात . काळाच्या ओघात भरपूर झीजही झालेली दिसते.

चित्र क्रमांक ७ . आयुधांवरून मूर्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न

मूर्तींच्या उजव्या हातात सर्वप्रथम गदा दिसते मग वरच्या उजव्या हातात सुदर्शन चक्र मग वरच्या डाव्या हातात शंख आणि खालच्या डाव्या हातात अस्पष्ट पणे कमळ दिसते. गचपश म्हणजे गदा, चक्र, शंख आणि पद्म तर अग्निपुराण, पद्मपुराणा प्रमाणे ही माधवाची ( विष्णूचीच ) मूर्ती आहे हे स्पष्ट होते . 
संदर्भ : - मूर्ती विज्ञान , डॉ . गणेश हरि खरे .

चित्र क्रमांक ८ . बारव आणि त्यातली समृद्ध जैव विविधता

मानवासोबतच इतरही जीव बारवांशी जोडलेले असतात . सर्वात महत्त्वाचे म्हणजे  कासव आणि मासे . आणि त्यांच्यावर गुजराण करणाऱ्या पक्ष्याचं खंड्याचं ( King Fisher ) हे छायाचित्र .

अतिरिक्त माहिती आणि छायाचित्रांसाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा.

लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार.

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
थोडक्यात आणि मुद्देसूद !! छान लिहिलंय
संतोष जोशी बोरिवली पुर्व् म्हणाले…
वैशिष्टयपूर्ण, सखोल, अभ्यासपुर्ण,माहिती..... शेअर केल्याबद्दल आपले आभार 🙏🙏
Kalpit Raut म्हणाले…
खूपच छान माहिती असून महत्वाचे म्हणजे छायाचित्रान सोबत माहिती आहे.
Prachi म्हणाले…
सुंदर माहिती व अप्रतिम छायाचित्र
राहुल, खूपच अभ्यासपूर्ण लेख! आपल्या पूर्वजांना पाणी या संपत्तीचं किती महत्त्व होतं, साठवणूक करण्याबरोबरच देवतांची स्थापना करून पाण्याचं रक्षण, संवर्धन करण्याची तळमळ होती.
आणि स्थापत्यशास्त्र तर अप्रतिम, अद्वितीय होतंच. तुझा अभ्यास असाच सुरु राहो, अनेक आशीर्वाद!
Rahul Abhyankar म्हणाले…
@ जोशी सर, कल्पित, प्राची खूप खूप धन्यवाद !
@ ठाकूर मॅडम, खूप खूप धन्यवाद ! असेच आशिर्वाद असू द्या . आपला कृपाभिलाषी 🙏
Unknown म्हणाले…
Very detailed information 👌👌
Keep on doing such creative work.
Great going👍🏻

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी ॥ श्री गणेशाय नमः ॥ भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .  चित्र क्रमांक १ . जलदुर्ग अर्नाळा येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प . चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया . विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे...

गणरायाचं खरं रूप: शास्त्र, संस्कृती आणि पर्यावरणपूरक मूर्ती !

 ||  श्री गणेशाय नम:  || " अरे राहुल ! गणपतीचे डोळे कधीही सरळ एका रेषेत आणि आडवे नसतात. गणपती हे गजवक्त्र म्हणजे हत्तीचे तोंड/मुख असलेली देवता आहे. आणि हत्तीचे डोळे तिरके असतात. तुम्ही मुंबईकरांनी स्वतःला वाट्टेल तसा गणपती घडवलात. त्याला उगाचच मानवी स्वरूप दिलंत. माणसासारखे सरळ आणि आडवे डोळे असल्यामुळे तो गणपती माणसासारखा दिसतो आणि त्यामुळे कदाचित तो तुम्हाला लोभस वाटतो. पण हि प्रथा बरी नव्हे. " इति नंदा आजोबा.  कैक वर्षांपूर्वी मी आमच्या मूळ गावी ( मिरज ) गेलो होतो. मी सुध्दा कैक वर्ष विरारच्या  गणपतीच्या कारखान्यात काम शिकत होतो. सहज म्हणून गावच्या कारखान्यात एक चक्कर मारली. सर्व गणपती थोडे वेगळे दिसले. आमच्या मुंबईत नाही असं बनत, तुमच्याकडचे साचे थोडे वेगळे आहेत. त्यावर नंदा आजोबांनी मला हे उत्तर दिलं. मुळातच तेव्हा माझी गणपती आणि मूर्ती शास्त्राबद्दलची जाण तशी बेताचीच असल्यामुळे तो विषय मग अलगद मागे पडला. पण कालांतराने मी ह्या मूर्तिशास्त्राचाअभ्यास सुरु केल्यावर मला आजोबा काय म्हणत होते ते स्पष्टपणे उलगडू लागले. अजून खोल खोल शोध घ्यायला सुरु केला तेव्ह...

विरगळ - Hero stone नौकादलाचा वीरगळ ( महाराष्ट्रातील एकमेव ) एकसार ( बोरिवली , मुंबई )

                      ॥ श्री गणेशाय नमः ॥ हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसि महिम् । तस्मादुतिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय ॥  भगवदगीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या ३६ व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना म्हणतात की " हे अर्जुना ! युद्धासाठी तयार हो कारण युद्धात मरण पावला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जर का तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य उपभोगायला मिळेल त्यामुळे युद्धाचा निश्चय कर आणि तयार हो. " आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून युद्धांमध्ये वीरमरणाची प्राप्ती व्हावी याला अपार महत्व दिले गेलंय. आणि अशा या वीरांचे स्मरण येणाऱ्या पिढीला कायमस्वरूपी होत राहावं म्हणून जो शिल्प विशेष उदयाला आला तो म्हणजे विरगळ (Herostone )! वीरगळ समजून घेण्यासाठी त्याच्या मुळ संरचनेला समजून घ्यावं लागतं. काळ आणि स्थानपरत्वे त्याच्या रचनेत थोडं भिन्नत्व आहे परंतु वीर मरण आलेल्याचं स्वर्गरोहण आणि स्वर्गप्राप्ती या मूलभूत गोष्टी प्रत्येक शिल्पात आढळून येतात .  वीरगळ बनवण्याची संकल्पना ही साधारणतः सातवाहन क...