गोधन संरक्षणाचा वीरगळ - अमृतेश्वर मंदिराजवळ , रतनवाडी, भंडारदरा
॥ हर हर महादेव ॥
यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाच्या आधीच्या युगात पशुधन हे पण माणसाची मालमत्ता समजली जाई . ब्रिटीश काळात आणि थोडं त्यापूर्वीच्या काळात ओसरीवर झोपाळा , स्वतःची विहीर आणि गुराढोरांचा पसारा असणारा माणूसही श्रीमंत समजला जाई . शेतीसाठी पशूपालनाची गरज आणि त्या निमित्ताने का होईना पशू पक्ष्यांशी माणसांचा जिव्हाळा होता . वैदिक काळात तर गायींचा वापर चलन म्हणून केला जाई . मग कालांतराने विकत घेतलेल्या वस्तूच्या मोबदल्यात अर्धी गाय किंवा पाव गाय देणे शक्य नसल्याने इतर वस्तूंची देवाणघेवाण सुरु झालं . याची अखेर चलन व्यवस्थेत झाली तरी पशुधन, गोधन हे शब्द आजही व्यवहारात आहेत . ( संदर्भ : - प्राचीन भारतीय नाणकशास्त्र , एम. के . ढवळीकर ) .
ह्या पशुधनावर अनेकदा हल्ले होत असत . कधी श्वापदं ( वाघ , सिंह , कोल्हा इत्यादी ) , तर कधी टोळीयुद्ध, तर कधी चोर दरोडेखोर, इतर राज्यातले सैनिक इत्यादी पशुधनावर हल्ला करत असत . अशा वेळेला स्वतःचं पशुधन वाचवायला लोक प्राणांची बाजी लावायला ही कमी करत नसत . आणि जर या प्रसंगात ते मृत्यूमुखी पडले तर त्यांच्या बलिदाना प्रित्यर्थ त्यांच स्मारक दगडात घडवलं जाई जे येणाऱ्या पिढ्यांना साक्ष देई . असाच एक पशुधनाशी संबंधित एक वीरगळ आपण पाहणार आहोत .
चित्र क्र . १. बेवारस पडलेले वीरगळ, रतनवाडी , भंडारदरा .
चित्र क्रमांक १ मध्ये वीरगळ असेच झाडाच्या कडेला टेकवून ठेवलेले दिसत आहेत . न जाणो किती ऊन पावसाळे पाहीले असतील त्यांनी !

चित्र क्र . २ वर्षानुवर्षांच्या ऊन पावसाच्या आघाताने झिजलेला वीरगळ
चित्र क्रमांक दोन मध्ये झिजलेला वीरगळ दिसतो . वीरगळावर बहुतेक वेळा कोणत्याही प्रकारचं लेखन केलं जात नाही . त्यामूळे त्याच्या इतिहासाचा स्पष्ट मागोवा घेता येत नाही . तरीही त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून प्रसंग पुन्हा एकदा उभा केला जाऊ शकतो. सदर वीरगळ झिजला असल्याने मी त्याला थोडं संपादित करून समजता येईल असा प्रयत्न केला आहे .
चित्र क्र . ३ . वीरगळाचे संपादित केलेले छायाचित्र .
चित्र क्रमांक ३ मध्ये दाखावलेल्या वीरगळाचे एकूण ४ कप्पे करून त्याला समजता येईल आणि प्रसंग पुन्हा उभा करता येईल . ( चित्र क्रमांक २ आणि ३ ची तुलना करून पाहाणे ) .
कप्पा क्र १ - सर्वात खालचा कप्पा .
सर्वसाधारणतः वीरगळाचा सर्वात खालचा कप्पा हा त्याच्या मृत्युचं कारण दर्शवतो . सर्वात खालच्या कप्प्यात ( पिवळ्या रंगात ) वीर मरून पडलेला दिसतो . त्याच्या सभोवती ( पांढऱ्या रंगात ) पशुधन उभे दिसते. प्रथमदर्शनी पाहताना असे वाटू शकते की तो वीर त्यांच्या पायदळी आला असावा . मात्र ते तसं नसून त्यांना वाचवताना तो धारातिर्थी पडला असं अभिप्रेत आहे.
कप्पा क्र . २ खालून दुसरा कप्पा
हा कप्पा घनघोर युद्ध दर्शवतो . धारातिर्थी पडलेला वीर ( पिवळ्या रंगात डावीकडे ) हातात ढाल आणि तलवार ( हिरवा रंग ) घेऊन लढताना दिसतो . तर त्याच्या समोर घोड्यांवर ( पांढरा रंग ) बसून हातात तलवारी ( हिरवा रंग ) घेऊन दोन स्वार ( पिवळा रंग ) येताना दिसतात . लढाई तुल्यबळ नसली तरी अशा सेने समोर धावून जाऊन त्वेषाने लढण्याचा पराक्रम वीराने केलेला दिसतो .
कप्पा क्र . ३ खालून तिसरा कप्पा
हा कप्पा वीराला वीरगती प्राप्त झाली असं दर्शवतो . डावीकडे एक पुरोहीत ( पिवळा रंग ) ( जटाभारा वरून ओळखावं ) शिवपिंडीवर भस्मलेपन करताना आणि मंत्रोच्चारण करताना दिसतो . उजवीकडे दोन वीर ( पिवळा रंग ) शिवलिंगाची पूजा करताना दिसतात . वीर मरणामुळे झालेली स्वर्गप्राप्ती ह्या कप्प्यात दर्शवतात .
कप्पा क्र . ४ सर्वात वरचा कप्पा .
हा कप्पा कलश ( आकाशी रंग ) दर्शवतो . सदर कलश हा त्या वीराला मोक्ष प्राप्त झाला याचं प्रतिक आहे . सर्वसाधारणतः कलशाभोवती वाघ, सिंह किंवा शरभ (
शरभ म्हणजे ? ) हे कलशाचे संरक्षक म्हणून कोरले जातात . किंवा सुर्य चंद्र ( यावत् चंद्र दिवाकरो ) कोरले जातात . सदर वीरगळावर कलशाभोवती जे काही कोरलं आहे ते अत्यंत अस्पष्ट आहे त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही .
थोडक्यात सदर वीरगळ न बोलताही त्या काळची शिल्पकला , समाजव्यवस्था, लोकांच्या मनोअवस्था आणि तत्कालीन समजुतीं बदद्ल बरंच काही सांगून जातो . म्हणूनच यांचं संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे . वस्तूचं मूल्यं माहीत नसेल तर कसं काय कोणी तिला सांभाळेल ? ती कळावी म्हणून हा लेखप्रपंच .
लोभ असावा ....!
राहुल अभ्यंकर , विरार
अजून माहीती, छायाचित्र आणि अभिप्रायासाठी इन्स्टाग्राम वर संपर्क करा .
टिप्पण्या
सखोल अभ्यास केला आहे, फोटो मुळे आणखीन स्पष्टता झाली
आनंद झाला
कृपया मला आपला संपर्क नंबर माझ्या 9272303212 ह्या नंबरवर देऊन सहकार्य करावे ,
आनंद झाला तूझ्या अभ्यासपूर्ण लेखना बद्दल तूझ खुप खुप अभिनंदन