॥ श्री गणेशाय नमः ॥
अप म्हणजे पश्चिम आणि ज्या भूमीचा अंत पश्चिमेला होतो ती भूमी म्हणजे अपरांत म्हणजेच आजचं कोकण ! परशुरामाने स्वतःच्या सामर्थ्याने ढकलून तयार केलेली ही भूमी भौगोलिक दृष्ट्या ही भारताच्या इतर भागांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात सर्वात जास्त नजरेत भरणारा फरक आहे तो कोकणात सापडणार्या खडकाचा !कोकणात सापडणारा लालसर आणि ठिसूळ दगड हा जांबा खडक म्हणून ओळखला जातो. बेसॉल्ट खडकाशी तुलना केल्यास जांबा खडका लेणी खोदण्यासाठी किंवा मूर्ती घडवण्यासाठी फारसा उपयुक्त नाही. तरीपण गोव्यातल्या हरवाळे येथील लेणी लहानशी असली तरी खूप आकर्षक आहेत.
चित्र क्र १ . हरवाळे येथील धबधबा
कोणत्याही ठिकाणी लेणी घडवताना तिथे राहणाऱ्या लोकांना बारा महिने पाण्याची सोय व्हावी हे लक्षात घेऊनच लेणी घडवली जात. हरवाळे इथला धबधबा गोव्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. हरवाळे येथील लेणी ह्या धबधब्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. धबधब्यातून होणारा पाण्याचा विसर्ग हा लेण्यांसमोरूनच खळखळ करत वाहत जातो आणि लेण्यात बसलेल्यांना आत्म शांततेचा अनुभव देतो. चित्र क्र १ नीटपणे पाहिल्यास दगडाच्या प्रस्तराचा फरक कळून येईल.
चित्र क्र २ . हरवाळे लेण्यांचा दर्शनी भाग
चित्र क्रमांक दोन मध्ये दर्शवल्याप्रमाणे हरवाळ्याची लेणी ही जांभा दगडाच्या एका लहानशा टेकडीत कोरलेली आहेत. ह्या लेण्यांमध्ये तीन प्रार्थना कक्ष आहेत. तिन्ही कक्षांमध्ये शिवलिंग सदृश्य लिंग आढळून येते. लिंगांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर सहाव्या - सातव्या शतकातला शिलालेख आढळतो.
चित्र क्र ३ . लेण्यांमधील प्रार्थना कक्षातील पहिलं लिंग
चित्र क्र ४ . लेण्यांमधील प्रार्थना कक्षातील दुसरं लिंग
चित्र क्र ५ . लेण्यांमधील प्रार्थना कक्षातील तिसरं लिंग
चित्र क्र ३, ४ आणि ५ मध्ये दाखवल्या प्रमाणे लेण्यांमधील तिन्ही कक्षांमध्ये प्रार्थनेसाठी लिंग आहेत. मूर्ती पूजेमध्ये लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा आपल्याला आपल्या आराध्य देवतेची अचूक मूर्ती घडवता येत नसेल तर तिला लिंग स्वरूपात पूजलं जातं. मूर्तिशास्त्राचं हे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. प्राचीन काळी अनेक देवळांमध्ये तांदळा ( तांदूळ नव्हे ) स्वरूपामध्ये बऱ्याचशा देवांचे पूजन केलं जातं. अगदी सत्यनारायणाच्या पूजेतही आपण गणपती म्हणून सुपारीच मांडतो की !
ह्या लिंगांचं नीट निरीक्षण केल्यास असं आढळून येतं की ही लिंग तिथे आढळणाऱ्याच दगडांमध्ये घडवली गेली नाहीयेत. लिंगांसाठी लागणारा दगड हा दुसरीकडून आणून वैशिष्ट्यपूर्णरित्या घडवला आहे. चित्र क्रमांक चार मध्ये लिंगाच्या मध्यभागी पडणारा प्रकाश हा व्यवस्थित परावर्तित होताना दिसतो. यावरून लिंगाच्या दगडाची आणि त्याला घासून गुळगुळीत केलेल्या पोताची ( texture ) कल्पना यावी.
चित्र क्र ६ . लेण्यांमधील प्रार्थना कक्षातील चौथं लिंग
या लेण्यांचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जांभा खडक असल्यामुळे भिंतींवर किंवा व्हरांडयामध्ये लेख कोरणं शक्य नव्हतं. त्यामुळे लिंगासाठी वापरलेल्या वैशिष्ट्यपूर्ण दगडावरतीच शिलालेख आढळून येतात. शिलालेखाची ब्राम्ही लिपी सहाव्या शतकाच्या अखेरच्या काळातील ब्राम्ही लिपीच्या अक्षरांशी मेळ खाते. यावरून लेण्यांचा काळ समजण्यास मदत होते. शिलालेखात संबपूर गावात राहणाऱ्या रवी ह्या दानकर्त्याचा उल्लेख येतो. तसंच ही लेणी शिव, कार्तिकेय आणि सूर्योपासनेसाठी बांधली असावीत असे शिलालेखांवरून प्रतित होतं.
चित्र क्र ७ . लेण्यांच्या प्रार्थना कक्षांसमोरील व्हरांडा
चित्र क्र ८ . रुद्रेश्वर महादेव देवस्थान, हरवाळे
चित्र क्र ९ . हरवाळे जलाशय
लेण्यांचा आजूबाजूचा परिसर हा अतिशय निसर्ग रम्य आहे. धबधबा, त्यावर बांधलेला लहानसा बांध, त्याचा जलाशय, बाजूलाच असलेलं रुद्रेश्वर महादेवाचं मंदिर या सर्वांमुळे जागेत अगदी सुंदर स्पंदनं आहेत. कधी गोव्याच्या सहलीला गेलात तर ती नक्की अनुभवा !
तळ टिप : सदर लेण्या गोवा राज्यात आहेत. गोव्यात पूर्वापार पोर्तुगिज लोकांचा अंमल असल्यामुळे गावांची दोन नावं आहेत. हरवाळे हा स्थानिक शब्द असून Harvalem हा इंग्रजी शब्द या स्थानाला लागू पडतो.
लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार !
Instagram - chaturthamiti
टिप्पण्या
धन्यवाद !