हर हर महादेव
प्राचीन मंदिरांची विविध उप अंगे आहेत. त्यातलं सर्वात लक्षणीय अंग म्हणजे मंडोवर म्हणजेच मंदिराची बाह्य भिंत. ह्या बाह्य भिंतीवर मंदिराच्या आतल्या देवते सोबतच्या इतर उप देवता , त्या मुख्य देवतेचे अवतार कार्य , काही प्रसंगी रामायण, महाभारत इत्यादी पौराणिक कथांचे , युद्ध प्रसंगांचे शिल्प किंवा शिल्प पट आढळतात. सर्वात जास्त शंकर आणि विष्णूची देवळं आढळतात आणि जो देव मुख्य गाभाऱ्यात स्थापित असेल, त्याची शिल्पं जास्त आणि दुसऱ्याची काही मोजकी शिल्पं ह्या बाहय भिंतीवर आढळतात. त्यातली सर्वात आकर्षक आणि नित्य आढळणारी मूर्ती म्हणजे रावणानुग्रह ! आकर्षक ह्यासाठी की सदर मूर्तीमध्ये अनेक रसांचं वर्णन आहे जसं की वीर, करुणा,शृंगार, भय इत्यादी ! हे सर्व रस आणि कैलास पर्वत, शिवाचे गण, दास, दासी, नंदी इत्यादी दाखवताना मूर्तिकाराच्या कौशल्याचा कस लागतो.
मंदिरात आढळणाऱ्या या बऱ्याच मूर्ती एकमेव शिल्प नसून अनेक शिल्पांचा शिल्पपट असतो. शिल्पपट समजण्याकरता त्याची मूळ कहाणी माहीत असावी लागते आणि त्या मूळ कहाणीचा आधार घेत संपूर्ण शिल्पाची कल्पना सहज करता येते. रावणानुग्रह या शिल्पाची कहाणी : - एकदा रावणाने कुबेराला युद्धात हरवून त्याच पुष्पक विमान जिंकलं आणि परतीच्या प्रवासात कैलासा जवळून जाताना तिथे मुक्काम केला आणि विश्रांतीनंतर निघताना त्याला आढळलं कि पुष्पक विमान जागेवरून हलत नाही. नंदिकेश्वर नावाच्या शिवाच्या गणाने रावणाला येऊन सांगितले की उमा पार्वती कैलासावर क्रीडा करत असल्यामुळे कोणालाही त्यांच्या सानिध्यात जाण्याची अनुमती नाही. मात्र नुकत्याच मिळालेल्या विजयामुळे उन्मत्त रावणाने कैलास पर्वत उखडून फेकण्यासाठी आपल्या हातांमध्ये उचलला. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे शिवाचे सर्व गण, दास, दासी, कैलासा वरील पशुपक्षी भयभीत झाले. ही आगळीक रावणाने केली असल्याचे जाणून शंकराने आपल्या अंगठ्याखाली कैलास पर्वत दाबून ठेवला. शिव शंकराच्या योग मायेच्या दाबामुळे रावणाला कैलासाचा भार सहन होईनासा झाला. त्यामुळे रावण शरण आला आणि त्याने शंकराची स्तुती करण्यास सुरुवात केली. अहंकारी रावणाला शरण आलेला पाहून भोळ्या शंकराने त्याला तलवार आणि वीणा दिली. अनुग्रह म्हणजे आपला स्वीकार करणे किंवा आधार देणे. शंकराने रावणाला आगळीक केली तरी शरण आल्यानंतर आपलेसे करून वीणा आणि तलवार भेट दिली म्हणून या मूर्तीला रावणानुग्रह असे संबोधले जाते.
आता थोडा विचार दगडांचा करूया ज्यात ह्या मूर्ती घडवल्या जातात. पहिला दगडाचा पोत आहे बेसॉल्ट जो खास करून महाराष्ट्रात आढळतो. अग्निजन्य खडक म्हणजेच जमिनीतला लावारस भूपृष्ठावर येऊन हळूहळू थंड होऊन घट्ट अशी दगडाची संरचना तयार होते. या खडकात कोरलेली रावणानुगृहाची मूर्ती म्हणजेच चित्र क्र १ आणि २, वेरूळ येथील कैलास लेण्यातील मूर्ती. सदर खडक कोरीव कामासाठी आव्हानात्मक ! मूर्तीचा मूळ उद्देश रावणाची आणि शंकराची कहाणी दर्शवणे हेच वाटतं. मूळ कहाणी व्यतिरिक्त बाकी कुठल्याही गोष्टींवर विशेष प्रकाश टाकलेला दिसत नाही.
त्याउलट चित्र क्रमांक ३, ४, ५ बेलूर येथील चेन्नकेशवा मंदिरातील मूर्ती ! दगडाचा प्रकार सोप स्टोन. हा दगड जमिनीत असताना साबणासारखा मऊ असतो त्यामुळे त्याच्यावरती कोरीव काम करणं अतिशय सोपे असते त्याच सोबत या दगडाचा वातावरणाशी संबंध आल्यानंतर तो अगदी टणक बनतो.दगडाच्या या वैशिष्ट्यामुळे तो शिल्पकामासाठी आदर्श वाटतो .
चित्र क्र. १ कैलास लेण्यातील रावणानुग्रहाची मूर्ती, वेरूळ.
रावणाने उचलून धरलेला कैलास पर्वत आणि त्याच्या चेहऱ्यावरील वीर रसाचे अंकन .
चित्र क्र. २ कैलास लेण्यातील रावणाणुग्रह मूर्तीच्या वरचा भाग, वेरूळ.
रावणाने कैलास पर्वत उचलून धरल्यानंतर कैलास पर्वतावर चा गोंधळ मोजके शिवगण दास दासी आणि प्रसंग पाहायला आलेले काही देवतागण
चित्र क्र. ३ रावणानुग्रहाची संपूर्ण मूर्ती, बेलूर.
चित्र क्र. ४ रावणाानुग्रहाचे मूर्तीचा कैलासाचा भाग, बेलूर.
रावणाने कैलास पर्वत उचलल्यानंतर कैलास पर्वतावरील लोकांची उडालेली तारांबळ यात दिसून येते. सदर छायाचित्र मोठे करून पाहिल्यास त्यात विविध गायक, वादक हातात बासरी, ढोल इत्यादी वाद्य घेऊन वाजवताना दिसतात. सोबतीला शंकराच्या उजवीकडे ब्रह्मदेव दिसून येतो. त्याचे काही गण हातात पुष्पमाला घेऊन दिसतात. विविध यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा इत्यादींचं सुरेख शिल्प ह्यात पाहायला मिळतं. सोबतीने शंकराने पार्वतीला कमरेत दिलेला आलिंगन बघायला मिळतं, जो की उमा महेश्वराच्या शृंगार रसाकडे निर्देश करतो. सोबतीने शंकराच्या पायाखाली असलेल्या नंदीच्या शिल्पावर लक्ष दिल्यास त्याचे दुमडलेले पाय, त्याचे अलंकार, त्याच्याभोवती असणारे शिवगण स्पष्ट दिसून येतात
दशाननाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यावरचा वीर भाव आणि त्याचे गर्विष्ठ हास्य दिसून येते. हातातली तलवार, हात, खांदे,छातीवरचे दागिने, मुकुट इत्यादी त्याचा रुबाब दर्शवतात. शंकराने केवळ अंगठ्याने कैलास पर्वत दाबून ठेवल्याने त्याचा सहन होत नसलेला भार दर्शवण्याकरता तो गुडघ्यातन वाकलेला दर्शवलेला आहे.
संदर्भ :- शिवमूर्तये नम: , डॉ. गो. बं. देगलूरकर. .
राहुल अभ्यंकर , विरार !
Instagram :- chaturthamiti
चतुर्थमितीचे इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
टिप्पण्या