॥ हर हर महादेव ॥
जांभा खडकातल्या लेण्यांचं अस्सल सौंदर्य पाहायचं असेल तर गोव्यात खांडेपार नावाचं गाव गाठावं. गोव्यातल्या ५१ संरक्षित स्मारकांपैकी एक म्हणजे फोंडा येथील खांडेपार नदीजवळील खांडेपार लेणी ! स्थापत्य शास्त्रातल्या नेहमीच्या ठोकताळ्यांना बगल देत वेगळ्याच पद्धतीने बनवलेल्या लेण्या पाहायला मिळतात. सर्वसाधारण लेण्यांच्या आजूबाजूला आणि वरती खडक पाहायला मिळतो ज्यामध्ये लेण्या कोरलेल्या असतात. पण खांडेपारच्या लेण्यांमधे चक्क दगडात कोरलेलं शिखर दिसतं (चित्र क्र १ पहा). सध्या ही शिखरं अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. ह्या लेण्या दगडात कोरलेल्या वाटत नाहीत. उलट दगड आणून मंदिर बांधाव अश्या पद्धतीने बांधल्या आहेत. पण नीट निरीक्षण केलं तर कोरीव काम की बांधकाम असा प्रश्न पडतो हे त्याचं सौंदर्य विशेष !
चित्र क्र १. खांडेपारची लेणी.
चित्र क्र २. लेण्यांच्या आतली संरचना
एकूण ४ लेण्यांचा समूह पाहायला मिळतो. त्यात तीन लेण्या एकमेकांना लागून आहेत. यातल्या प्रत्येक लेण्यांमध्ये २ खोल्या आहेत. जवळूनच खांडेपार नदी वाहते. सर्व लेण्या अगदी साध्या आहेत. जांभा खडकांचं सौंदर्यच त्याला उठाव देण्यासाठी पुरेसं आहे.
चित्र क्र ३. लेण्यांच्या छतावरील कमळाच्या पाकळ्यांचं शिल्प
लेण्यांच्या छतावर कमळाच्या पाकळ्यांचं शिल्प आहे. चित्रात ते अस्पष्ट दिसत आहे त्यामुळे ते कळून येत नाही. दारांवर लाकडी दरवाजासाठी चौकट बसवता येईल अशी संरचना आढळते. त्यांचबरोबर भिंतीतले कोनाडे, पाण्याचा निचरा व्हावा म्हणून केलेली लहान भोकं प्रत्येक लेण्यात दिसून येतात. एकंदरीतच राहणाऱ्यांच्या निवासाची उत्तम सोय केलेली दिसते.
चित्र क्र ४. भिंतीतले कोनाडे.
चित्र क्र ५. एका लेण्यातून दिसणारं दुसरं लेणं.
चित्र क्र ६. चौथ्या लेण्यातील लिंगपीठ आणि योनीपीठ .
ह्या लेणीसमूहात चौथं लेणं स्वतःच स्वतंत्र अस्तित्व राखून आहे. तीन लेण्या आणि त्यातल्या सहा खोल्या निवासासाठी तर चौथं लेणं हे भगवंतासाठी राखून ठेवलं असावं असं वाटतं. सध्या जरी पूजाकार्य होत नसलं तरी जुन्या काळात हे नक्कीच छोटेखानी देऊळ असावं असं त्याच्या सद्यस्थितीवरून वाटतं. ह्या चौथ्या लेण्यात योनीपीठावरील लिंगपीठ आढळून येतं. हरवाळे लेण्यांप्रमाणेच इथेही शिव उपासना घडत असावी. सध्याचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे गणेश मूर्ती असलेला मातीचा दिवा !
चित्र क्र ७. गणेश मूर्ती असलेला मातीचा दिवा.
हा दिवा अतिशय आकर्षक आहे. ह्यात दोन हातांचा गणपती आढळतो. आखूड मांड्या, लांबलचक सोंड, आशिर्वादाचा हात, दुसऱ्या हातात मोदक, डोक्यावर लहानसा मुकूट ही मूर्ती वैशिष्ट्ये दिसतात. सोबत चार दिव्यांसाठी केलेली योजना दिसते.
चित्र क्र ९. नदीवरील झोकदार वळण.
लेण्यांचा परिसर लोकवस्ती पासून जरासा लांब आहे. त्यामुळे ह्या निसर्ग रम्य परिसरात नेहमी पक्ष्यांची वर्दळ असते. चित्र क्र ८ मध्ये मला दिसलेला दयाळ पक्षी कॅमेर्यात मी टिपून घेतला. लेण्यांच्या समोरून खांडेपार नदी वाहते. पाण्याच्या संथ प्रवाहावरून नदीच्या खोलीची कल्पना करावी . पाणी इतकं स्वच्छ, शुद्ध, आणि निर्मळ आहे की त्यात पडलेलं प्रतिबिंब आणि वरचं आसमंत ह्यात फरक न ओळखता यावा !
कमेंट आणि शेअर करून आपला लोभ व्यक्त करावा !
राहुल अभ्यंकर, विरार
Instagram - chaturthamiti
टिप्पण्या
सोबतची छायाचित्रे सुरेख आहेत.