श्री गणेशाय नमः
मूर्ती शास्त्राचा अभ्यास करताना मूर्ती वैविध्याचाही अभ्यास आपसूकच घडतो आणि ह्याची प्रचिती मला वेरूळ इथल्या हरिहरत्मक रुक्मिणी पांडुरंग मूर्ती या मूर्तीचा अभ्यास करताना आली. एखादी मूर्ती स्वतःमध्ये शंकर विष्णू आणि पांडुरंग या तिघांचं जर तेज धारण करत असेल तर त्याच्या सौंदर्याची कल्पना करा.
आता सर्वप्रथम मूर्तीची माहिती आणि थोडासा इतिहास समजून घेऊया. ही मूर्ती वेरूळ इथल्या बारा ज्योतिर्लिंग पैकी घृष्णेश्वर मंदिराच्या एक किलोमीटरच्या अंतरावर टोपरे कुटुंबीयांच्या घराजवळ सुप्रतिष्ठित आहे. मूर्तीच्या दैनिक पूजेचे आणि सेवेचे सौभाग्य टोपरे कुटुंब गेली सातशे वर्ष सांभाळत आहेत. मी प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांनी माझं उत्तम स्वागत केलं आणि त्याचबरोबर संपूर्ण वेळ चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत मूर्ति बद्दलच्या माझ्या प्रश्नांचं उत्तम निरसन केलं त्याबद्दल त्यांचे अनंत आभार !
ही मूर्ती तिथे कशी आली याबद्दलची कथा त्यांच्याकडूनच ऐकायला मिळाली ती खालील प्रमाणे :
खूप पूर्वी सातशे वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला जमीन नांगरताना जमिनीत काहीतरी अडलं आणि काय आहे हे बघायला गेला तर जमिनीतून रक्ताची धार निघत असताना त्याला दिसलं. आजूबाजूची जमीन खणून मोकळी केल्यावर त्याला सदर मूर्ती नजरेस पडली. त्यावेळेस त्या गावांमध्ये मल्हार स्वामी म्हणून एक महाराज तपश्चर्या करत होते. शेतकऱ्याने त्यांना भेटून विनंती केली की मला शेतामध्ये नांगरताना अशी मूर्ती सापडली आहे आणि माझ्याकडनं तर तिची पूजा अर्चा होणे शक्य नाही तर तिला तुमच्या सानिध्यात आणून ठेवतो जेणेकरून तिची दैनिक पूजाअर्चा करणे सोपे होईल. महाराजांनी संमती दिली आणि शेतकऱ्याने त्या काळामध्ये उपलब्ध असलेल्या गाडीवरती दोन बैल लावले आणि त्यावर ती मूर्ती उचलून ठेवली. पण दोन बैलांनी ती मूर्ती पुढे खेचली जाईना तेव्हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे चार बैल आठ बैल असं करत करत बऱ्याच बैलांची शक्ती वापरूनही ती मूर्ती काही हलेना. शेवटी परत महाराजांकडे येऊन त्या शेतकऱ्यांनी प्रसंग कथन केला आणि त्यांना शेतात येण्याची विनंती केली. महाराज मूर्ती सापडलेल्या शेतात आले आणि त्यांनी मूर्तीला हात जोडले आणि सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत चला. बाकी शेतकऱ्यांनी ती मूर्ती उचलून महाराजांच्या डाव्या खांद्यावर दिली आणि इतकी प्रचंड मूर्ती महाराजांनी एकट्याने उचलून त्यांच्या मठाजवळ आणून सुप्रतिष्ठित केली. नांगरताना झालेल्या जखमेचा व्रण आजही या मूर्तीवर दिसून येतो. सातशे वर्षांपूर्वी शेतात सापडली म्हणजे या मूर्तीचा मूळ किती जुना असेल यासाठी कल्पनेचाच आधार घ्यावा लागेल !
मूर्तीबद्दल विवेचन करायचं झाल्यास तिचं नाव हरिहरात्मक रुक्मिणी पांडुरंग का असावं तर ह्याची दोन कारणं, एक म्हणजे मल्हार स्वामी यांनी स्वतः हे नाव या मूर्तीला दिलं आणि मूर्तीचे अलंकार त्याची आयुधं या सगळ्याचा विचार केला तर यामध्ये शंकर आणि विष्णूची आयुधं आढळून येतात. मूर्ती अष्टभुजा म्हणजे आठ हातांची आहे. प्रत्येक हातात आठ वेगवेगळी आयुधं दिसून येतात.
विष्णूच्या आयुधांबद्दल :
विष्णूची आयुधं म्हणजे शंख चक्र गदा आणि कमळ. मूर्तीच्या उजव्या हातात गदा आणि कमळ आढळून येतात. गदा भलीमोठी असून त्यावर किर्तीमुख आणि मारुती कोरलेला दिसतो. मूर्तीच्या डाव्या हातात शंख आणि चक्र आढळते. शंखाच्या बनावटीवरून तो पांचजन्य शंख असल्याचे अंकित होते. पांडुरंगाच्या हातातही शंख दिसतो त्या अनुषंगाने ही पांडूरंगाची मूर्ती असल्याचा अंदाज बांधता येतो.
शंकराच्या आयुधांबद्दल :
ह्या मूर्तीत शंकराची काही आयुधं आहेत पण ती सुस्पष्ट नाहीत. मूर्तीच्या उजव्या हातात सर्वात वरती तलवार / खड्ग सदृश्य आयुध तर उजव्या हातात पाठच्या बाजूला भाल्या सदृश्य आयुध आढळतं. डाव्या हातात वरच्या बाजूला टंक ( दोन्ही बाजूला त्रिशूळ ) सदृश्य आयुध दिसतं तर डाव्या हातात (शंखाच्या वरच्या बाजूस ) सर्प पकडलेला दिसतो. खड्ग, सर्प आणि टंक ह्या आयुधावरून शंकराची मूर्ती असल्याचा संदर्भ देता येतो.
बाकी मूर्तीला रुक्मीणी का म्हणतात हे मल्हार स्वामींनाच ठाऊक.
चित्र क्र ३ मूर्तीची उजवी बाजू
बाकी एकंदर मूर्ती अत्यंत सुबक, आखीव रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे. हातात अंगठ्या, बाजूबंद इत्यादी अलंकार सुंदर कोरले आहेत. दगडावर वज्रलेप केला असल्यामुळे दगडाचा पोत ( texture ) कळू शकला नाही पण मूर्तीची प्राचीनता पाहून तिच्यावर होयसळ कलेची छाप असवी हे नक्की !
लोभ असावा !
राहुल अभ्यंकर , विरार !
Instagram - Chaturthamiti
टिप्पण्या
वेगळ्याच प्रकारची शिल्पकला ! नेहमीप्रमाणे बारकाईने अभ्यास केला आहेस ! Keep it up. असंच संशोधन तुझ्याकडून होत राहो. मनःपूर्वक आशीर्वाद !
फोटो सुबक असल्याने आपण तिथेच उभे आहोत असा भास होतो.
धन्यवाद