॥ ॐ केशवाय नमः ॥
चेन्न म्हणजे कानडी भाषेत सुंदर आणि केशवा म्हणजे विष्णू, आणि सुंदर अश्या विष्णूचे मंदिर तेच चेन्नकेशवा मंदिर. कर्नाटक राज्यातल्या हासन जिल्ह्यात बेलूर या गावात हे भव्य दिव्य मंदिर आहे. भव्यतेची कल्पना मंदिर बांधायला १०३ वर्षे लागली यावरूनच घ्यावी. तेराव्या शतकात होयसळ साम्राज्यात हे मंदिर बांधले गेलं. मंदिराचा आवार अतिप्रचंड असून आत मध्ये साक्षात श्री विष्णूंची पूजा घडत असल्यामुळे आध्यात्मिक स्पंदनं सक्रिय आहेत.
चित्र क्र १ मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार
मंदिराचे मुख्य भाग
१) गोपूर
२) गरुड मूर्ती आणि गरुड ध्वज
३) मुख्य मंदिर
४) मुख्य मंदिराची लहान प्रतिकृती
५) झोपाळा - विशिष्ट दिवशी देवाला झोपाळ्यात बसवून झोके देतात ,
६) कल्याण मंडप - गावातल्या लोकांसाठी लग्ना साठी सभागृह.
७) देवीचं देऊळ.
८) बारव - देवळासाठी पाण्याची व्यवस्था, लहान विहीर.
९) कृष्ण मंदिर.
१०) मंदिराभोवतीचं दगडी कुंपण ( विविध नागदेवता आणि इतर देवतांची शिल्पं आणि सोबतच अनेक वीरगळ. )
आता मंदिराच्या वेगवेगळ्या भागांची महत्वाची माहिती घेऊया.
चित्र क्र २ गोपूर
मंदिरा समोरच अतिशय भव्य गोपूर दिमाखात उभं आहे. मंदिराच्या सभोवती दगडी भिंत आहे. गोपुराच्या खालून देवळात प्रवेश करता येतो. देऊळ तेराव्या शतकात पूर्ण झालं. आणि गोपुराचं बांधकाम सोळाव्या शतकात विजयनगर साम्राज्यातल्या राज्यकर्त्यांनी पूर्ण केलं. देवळाच्या बाह्य भिंतीवर काम शिल्पं अत्यंत कमी प्रमाणात आहेत मात्र गोपुरावर काम शिल्पं कोरलेली आहेत. गोपुराचा सर्वात वरचा भाग गायीच्या कानासारखा असल्यानं त्याला गोपूर म्हणतात.
चित्र क्र ३ गरुड मूर्ती आणि गरुडध्वज
गोपुरातून आत प्रवेश केल्यावर आपली भेट होते विष्णूच्या वाहनाशी म्हणजे गरुडाशी. पाठी पसरलेले पंख, हातावरील बाजूबंदामधे सर्प, बोटांमधल्या अंगठ्या , पाठीमागची प्रभावळ, डोक्यावरचा मुकूट, धन्युष्याच्या आकाराच्या भुवया, आणि गरूडाचं मानवी देह धारण केलेलं रूप सहज लक्ष वेधून घेतं. सदर मूर्ती आतल्या देवासमोर हात जोडून उभी आहे. गरुड म्हणजे प्रचंड सामर्थ्य. एका अखंड दगडात घडवलेल्या ह्या मूर्तीला नतमस्तक होऊन पुढे मुख्य देवळाकडे वळूया.
चित्र क्र ५ . मकरतोरणातील गरुड शिल्प किर्तीमुख उग्र नरसिंह आणि विष्णूचे दशावतार.
चित्र क्र 6 . मकरतोरण
देवळांच्या मुख्य प्रवेशद्वारावर आढळणारं महत्त्वाचे शिल्प म्हणजे मकर तोरण. मकर हा पौराणिक प्राणी असून तो अनेक वेगवेगळ्या प्राण्यांपासून बनलेला आहे. डुकराचं अंग, सिंहाचे पाय, माकडाचे डोळे, मोराची पिसं, हत्तीची
सोंड, गायीचे कान आणि मगरीचे तोंड अशा सात प्राण्यांची वैशिष्ट्य एकत्र करून मकर हा प्राणी बनतो.
सोबतच विष्णूचे दशावतार म्हणजेच मत्स्य कुर्मवराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की हे वाचकांच्या डावीकडून उजवीकडे या क्रमाने कोरलेले दिसतील. ( लाल रंगाची वर्तुळं ) .
मधोमध उग्र नरसिंह हिरण्यकश्यपूच पोट फाडताना दिसतो. हा नरसिंह होईसळ घराण्याचे कुलदैवत मानलं जातं.
नरसिंहाने सोळा हातांचं रूप धारण केलेले दिसतय. सर्वात वरच्या हातात हिरण्यकश्यपूचं आतडं फाडून बाहेर काढलं हे दर्शवताना शिल्पकाराने साखळी सदृश्य आतडी दाखवलेली दिसते.उरलेल्या हातांमध्ये एका हाताने हिरण्यकश्यपूच डोकं पकडलेले दिसतं तर दुसऱ्या हाताने त्याचा पाय धरलेला दिसतो.बाकी हातांमध्ये विविध आयुध म्हणजेच गदा कमळ धनुष्य आणि भाले पकडलेले दिसतात ज्यांच्या सहाय्याने नरसिंह इतरही राक्षसांचा संहार करताना दिसतो.
सोबतच वरती किर्तीमुख दिसतं. ( पिवळा आयत )

चित्र क्र ६ सिंहावर विजय मिळवणाऱ्या राजाचं शिल्प
होयसळांच्या सर्वात पहिल्या राजाने सिंहासारख्या ताकदवान प्राण्याची शिकार केली होती. त्यामुळे चित्र क्र ६ मध्ये दिसणारं शिल्प हे जणू त्यांचं राजचिन्ह म्हणावं लागेल. आणि त्यांनी बांधलेल्या मंदिराच्या दारात ते आवर्जुन आढळतं .
चित्र क्र ७ प्रवेशद्वाराच्या डावीकडील मदनाचं शिल्प
मंदिराच्या प्रवेशद्वारावर मदन रतीचा शिल्प आढळतं पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मदन आणि रती दोघेही वेगवेगळे दाखवलेले आढळतात. याचा अर्थ असा की कामादी विचार हे देवळाच्या बाहेरच सोडून मग देवळाच्या आत शिरावं .
मंदिराचा आवाका प्रचंड असल्याने पुढील लेखात मंदिराचा अंतर्भाग, बाह्य भिंतीवरील शिल्पं आणि प्रांगणातील इतर गोष्टी अंतर्भूत केल्या जातील. पुढील लेखांची लिंक मिळवण्यासाठी खालील गुगल फॉर्म मध्ये आपला ई मेल आयडी नोंदवावा. अधिक माहीती आणि छायाचित्रांसाठी इंस्टाग्राम वर संपर्क करा ( वेबसाईट वरील Follow us वर क्लिक करा. )
लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार .
टिप्पण्या
छान! उत्तम!
Shweta Thakur.