॥ श्री गणेशाय नमः ॥
हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसि महिम् ।
तस्मादुतिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय ॥
भगवदगीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या ३६ व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना म्हणतात की " हे अर्जुना ! युद्धासाठी तयार हो कारण युद्धात मरण पावला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जर का तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य उपभोगायला मिळेल त्यामुळे युद्धाचा निश्चय कर आणि तयार हो. "
आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून युद्धांमध्ये वीरमरणाची प्राप्ती व्हावी याला अपार महत्व दिले गेलंय. आणि अशा या वीरांचे स्मरण येणाऱ्या पिढीला कायमस्वरूपी होत राहावं म्हणून जो शिल्प विशेष उदयाला आला तो म्हणजे विरगळ (Herostone )! वीरगळ समजून घेण्यासाठी त्याच्या मुळ संरचनेला समजून घ्यावं लागतं. काळ आणि स्थानपरत्वे त्याच्या रचनेत थोडं भिन्नत्व आहे परंतु वीर मरण आलेल्याचं स्वर्गरोहण आणि स्वर्गप्राप्ती या मूलभूत गोष्टी प्रत्येक शिल्पात आढळून येतात .
वीरगळ बनवण्याची संकल्पना ही साधारणतः सातवाहन काळ म्हणजे सुमारे २२०० वर्षांपूर्वीपासून चालत आली आहे .सातवाहनांच्या व्यतिरिक्त वाकाटक, शिलाहार, राष्ट्रकुट, यादव ते अगदी मराठा साम्राज्य पर्यंत नियमित युद्ध आपण ऐकत आलो आहोत . साम्राज्यविस्तार आणि साम्राज्य संरक्षण ह्या दोन्हीसाठी युद्ध अटळ होतं. आज आपण जो वीरगळ बघणार आहोत तो महाराष्ट्रातला अत्यंत अनोखा असा नौकायुद्धाचा प्रसंग कोरलेला आणि महाराष्ट्रातला एकमेव ( नौकायुद्धाचा प्रसंग कोरलेला ) शिल्पपट आहे.
चित्र क्रमांक १ . बोरीवली मधील एकसार गावातील शिलाहार कालीन नौकादल निदर्शक वीरगळ .
वर निर्देशित केल्याप्रमाणे चित्र क्रमांक एक मध्ये वीरगळाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवपिंडी दिसून येते आणि संपूर्ण चित्रात वेगळी आणि उठावदार दिसणारी वस्तू म्हणजे त्या शिवपिंडीवर वाहिलेलं गुलाबी रंगाचे फूल ! वस्तुतः याच्या बाजुलाच एक अत्यंत सुंदर आणि लहानसं शिवमंदिर आहे .पण जुनं ते सोनं या हिशोबाने लोक आजही या वीरगळावरच्या शिवपिंडीला आस्थेने पुजतात .त्यामुळे आजही अज्ञान आणि आस्थेचा सुंदर मिलाफ बऱ्याचशा वीरगळांवरती दिसून येतो . म्हणूनच या लेखामध्ये मी वीरगळाचा प्रत्येक टप्पा आणि कप्पा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे .
चित्र क्रमांक २ . एकसार गावातील वीरगळाचा सर्वात खालचा कप्पा (लढाई निर्देशक ).
सर्वसाधारणतः वीरगळाचा सर्वात खालचा टप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवण्यासाठी असतो . यामध्ये विविध प्रकार असून त्याप्रमाणे वीरगळांचं वर्गीकरण केलं जातं. चित्र क्रमांक दोन मध्ये दाखवल्याप्रमाणे सदर वीरगळ हा नौका दलाच्या युद्धामध्ये आलेल्या वीराच्या वीरमरणाला दर्शवण्यासाठी उभारला गेला आहे . या सर्वात खालच्या कप्प्यामध्ये ३ नौका दिसून येतात. बारकाईने निरीक्षण केल्यास त्या शिडाच्या नौका होत्या हे दिसून येतं .सातवाहन काळामध्येच मोसमी वाऱ्यांचा शोध लागला होता आणि त्याचा वापर मुख्यत्वे व्यापारासाठी केला जात होता .सातवाहनांच्या नाण्यांवरती मिळालेलं जहाजाचं चित्र हे अधोरेखित करतं की अगदी तेव्हापासून आरमाराचं अस्तित्व भारतात होतं. शिडांव्यतिरिक्तही वल्ह्यांचा वापर नौकानयनासाठी केला जात असल्याचं दिसतं. मधल्या बोटीत बारकाईने लक्ष दिलं तर लढणारी माणस धनुष्यबाणाचा वापर करताना दिसतात तर काहीजण वल्ही मारताना दिसतात त्याचबरोबर नौकेच्या शेवटी एक माणूस सुकाणू धरून नौकेला दिशा दाखवताना स्पष्ट दिसून येतो आणि त्याला लागूनच असलेला दुसरा माणूस शिडाची दोरी सांभाळताना दिसतो. शिल्पकाराच्या कमी जागेत खच्चून जास्त शिल्प भरण्यामागचा उद्देश हा त्या घनघोर लढाईचं स्पष्ट शिल्पांकन व्हावं असा दिसतो. थोडक्यात ज्या वीराला मरण आलं ते ह्या नौका दलाच्या युद्धामध्ये आलं आणि ती लढाई बरीच घनघोर झाली असावी असं यातून आकलन होतं .
चित्र क्रमांक ३ . एकसार गावातील वीरगळाचा खालून दुसरा कप्पा ( स्वर्ग प्राप्ती निर्देशक )
सर्वात खालच्या कप्प्यात लढाईचा प्रसंग घडल्यावर त्याच्या वरच्या कप्प्यात सहसा त्या वीराला स्वर्ग प्राप्ती झाली असं अभिप्रेत करणारे शिल्प कोरलं जातं. वीराचं शौर्य आणि पराक्रम या कप्प्यातून सहज दाखवलं जातं. चित्र क्रमांक तीन मध्ये मध्यभागी असलेली शिवपिंडी वीर शिवाचा उपासक असल्याचा दर्शवते. त्याच बरोबर वीरमरण आल्यामुळे त्याच्या स्वर्ग प्राप्तीचा प्रसंग दर्शवते. चित्र क्रमांक तीन मध्ये शिवपिंडीवर (उजवीकडे) वाहिलेल्या गुलाबी रंगाच्या फुला च्या बाजूला एक पुरोहित उभा दिसतो. उजव्या हातातल्या भस्माच्या पुरचुंडीतून तो शंकरावरती भस्मलेपन करत असल्याचं दिसतं. पुरोहिताच्या मागे असलेल्या अप्सरा या सितार / वीणा सदृश्य तंतुवाद्य घेऊन गायन वादन करताना दिसतात. त्याच सोबत अप्सरांच्या वरती पुरोहिताचे काही शिष्यगण हे मंत्रोच्चारण करताना दिसतात . शिवपिंडीच्या दुसऱ्या बाजूला (डावीकडे) वीरगती प्राप्त झालेला वीर ( शिल्प भग्नावस्थेत ) चौरंगावर बसलेला दिसून येतो. पुरोहित त्या वीराला वेदमंत्र सांगतात .
चित्र क्रमांक ४ . एकसार गावातील वीरगळाचा खालून तिसरा कप्पा (स्वर्गरोहण )
वेदमंत्रांनी संपन्न झालेल्या शिव पूजनानंतर स्वर्गप्राप्ती झालेल्या वीराला अप्सरा स्वर्गात घेऊन जातात. चित्र क्रमांक चार मध्ये मधोमध वीर चौरंगावर बसलेला आढळतो ( वीराची मूर्ती पूर्ण भग्नावस्थेत ). त्याच्या आजूबाजूला चवऱ्या ढाळत उभ्या असलेल्या अप्सरा त्याच्या स्वर्गरोहणाची स्थिती दर्शवतात. वीराचा वेगळा कप्पा हा त्याने गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाचं द्योतक असतं. बऱ्याचदा अप्सरा वीराला खांद्यावर उचलून नेताना दाखवतात किंवा या शिल्पाप्रमाणे त्याच्यासाठी विशेष यानाची व्यवस्था केली जाते.
चित्र क्रमांक ५ . एकसार गावातील वीरगळावरील कलश (मोक्षप्राप्ती ).
वीरगळावरचा कलश मांगल्यासोबतच मोक्षप्राप्तीचंही प्रतिक आहे. चित्र क्रमांक पाच मध्ये कलश अत्यंत सुबकपणे कोरलेला आहे .त्यावरती श्रीफळ ( नारळ ) शोभून दिसतं . श्रीफळाभोवती यक्षिणी फेर धरून नाचताना दिसतात . कलशाचं भव्य आकारमान आणि सौंदर्य , सुबकता हे एका राजाचं वीरगळ असल्यांचं दर्शवतात. कारण इतकं भव्य, सुबक आणि सुरेख शिल्प कोरणाऱ्या शिल्पकाराला उत्तम मानधन द्यावं लागे आणि त्यासाठी राजा किंवा त्याचं राजघराणंच समर्थ असे.
सर्वसाधारणतः कोणत्याही वीरगळावर ब्राम्ही किंवा तत्सम लिपीतला शिलालेख उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यामागचा अचूक इतिहास हा छातीठोकपणे सांगता येत नाही. परंतू इतिहासकारांच्या मते एकसार येथील वीरगळाबाबत दोन मतप्रवाह आहेत. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता हेन्री कझिंग यांच्या मते शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्यात तेराव्या शतकात झालेल्या घनघोर युद्धात वीरमरण पावलेल्या सोमेश्वराचे हे शिल्पचित्रण आहे. तर डॉ. शिल त्रिपाठी यांच्या मते हे स्मारक गुजरातच्या परमार भोज राजा याच्या कोकण विजयाचे प्रतीक आहे. व इ.स. १०२० साली साष्टी येथील नौकादल निदर्शक वीरगळ जमीन एका ब्राम्हणाला दान दिली, असा निष्कर्ष काढला आहे.
संदर्भग्रंथ : - इतिहासाचे मूक साक्षीदार वीरगळ आणि सतीशिळा, श्री. अनिल दुधाणे.
राहुल अभ्यंकर, विरार.
टिप्पण्या
खूप छान लेख लिहिला आहे. चांगला अभ्यास केला आहे. चांगली माहिती तूझ्यामुळे मिळाली. सातवाहन काळात खुप काम झालं आहे. कुणीतरी हे काम करणे आवश्यक आहे. अभिनंदन
खूप छान लेख लिहिला आहे. चांगला अभ्यास केला आहे.सातवाहन काळात खुप काम झालं आहे. कुणीतरी हे काम करणे आवश्यक होते. अभिनंदन
विरगळी वर असलेल्या शिल्पाचा सूक्ष्म व अर्थपूर्ण अभ्यास!
कोकणात मालवण जवळ असलेल्या आचरा गावात रामेश्वर मंदिर आहे आणि तिथल्या आवारात असे अनेक स्तंभ उभारलेले आहेत. गावातच राहणारे श्री सुरेश ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या गावात होऊन गेलेल्या ठाकूर घराण्यातील पुरुषांच्या नावाने ते स्तंभ उभारले आहेत.
त्या बाजूला जाशील तेव्हा जरूर बघ.