॥ हर हर महादेव ॥
वीरगळांचे अनेक प्रकार आढळतात. त्यातला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे सतीशिळा. वीरगळ हा वीराच्या मृत्युचे कारण दर्शवतो तर सतीशिळा ही त्या वीराची पत्नी त्याच्या मृत्युनंतर सती गेली हे दर्शवते. सतीशिळा ओळखावी कशी हे समजण्यासाठी वीरगळाचे नीर निरीक्षण करावे. त्याच वीरगळावर जर कुठेही कोपरापासून दुमडलेला हात दिसला ( चित्र क्र १ ) तर त्या वीरगळाला सतीशिळा म्हणतात. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या ( ईगतपूरी, नाशिक ) पायथ्याशी प्राचीन जैन लेणी आहेत. त्यांच्या जवळ आढळलेल्या सतीशिळेबद्दल.
चित्र क्र ३. सतीशिळेचा खालचा टप्पा
चित्र क्र. ४. सतीशिळेचा मधला कप्पा
नेहमी प्रमाणे वीरगळ आणि सतीशिळा टप्प्या टप्याने समजून घेऊ.
कप्पा क्र १ . सर्वात खालचा कप्पा . चित्र क्र ( ३ )
सर्वात खालच्या कप्प्यात सती जाणारी स्त्री घोड्यावर बसलेली दिसते . सोबत तिच्या सहचरणी आहेत . त्यांच्या डोक्यावर सतीचे वाण आहे.
कप्पा क्र. २ वीरगळाच्या उजव्या बाजूला कोपरातून दुमडलेला हात ( चित्र क्र २ नारिंगी रंग )
स्वातंत्र्य पूर्व काळापर्यंत सती जाण्याची प्रथा होती. सती जाणे म्हणजे पतीच्या निधनानंतर पत्नीने त्याच्या चितेवर आत्मदहन करून घेणे. ( सदर प्रथा काळाच्या ओघात बंद झाली असल्याने त्यावर कोणतीही टिपण्णी म्हणजेच कमेंट करू नये ही वाचकांना नम्र विनंती ). जसं युद्धात वीरमरण आलं की स्वर्ग मिळे ही भावना समाजात रूढ होती तीच भावना सती जाणे ह्या चाली बद्दल होती. त्यामुळे वीराच्या चितेवर सती जाणं हे भाग्याचं समजलं जाई. सदर वीराची पत्नी सती गेली हे दर्शवण्यासाठी कोपरापासून दुमडलेला हात दाखवला आहे. हातावर ठळकपणे दिसणाऱ्या बांगड्या पत्नी सौभाग्यासह स्वर्गवासी झाली हे ठळकपणे दर्शवण्यासाठी आहेत.
कप्पा क्र. ३ वीरगळाचा खालून दुसरा कप्पा ( चित्र क्र. ४ )
हा टप्पा वीराच्या मृत्युनंतरचा प्रसंग दर्शवतो. सदर वीर हा मृत्युपश्चात शिवपिंडीची पूजा आणि आराधना करताना दिसतो. पाय दुमडून बसलेला नंदी, त्याच्या पाठीवरचं कुबड अगदी स्पष्ट दिसतं. वीराच्या पाठी त्याची पत्नी सुद्धा हात जोडून बसलेली दिसते. शिव आराधना करून त्यांना स्वर्गप्राप्ती झाली असं दर्शवले आहे.
कप्पा क्र. ४ सूर्य, चंद्र आणि कलश
चित्र क्र २ मध्ये कलशाच्या खाली चंद्रकोर आणि संपूर्ण सूर्य कोरलेले दिसतात. यावत्चंद्रदिवाकरो म्हणजेच जोवर आकाशात चंद्र सूर्य असतील तोवर यांची किर्ती टिकेल असा त्याचा अर्थ आहे. पण त्यावर शिलालेख नसल्याने लढाईचं कारण, वीराचं नाव आणि इतर बारकावे लक्षात येत नाहीत. सर्वात वर कलश काढलेला आहे. कलशाचा अर्थ सदर वीर दांपत्याला मोक्षपद मिळाला असा असतो.
लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार.
टिप्पण्या