॥ श्री गणेशाय नमः ॥
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही चतुसूत्री आपल्या शास्त्रात प्राचीन काळापासून सांगितली आहे. भारतातली आणि भारताबाहेरील काही निवडक मंदिरं पाहताना तुम्हाला ही चतुसूत्री आवर्जून पाहायला मिळेल. देवळांच्या बाह्य भिंती म्हणजेच मंडोवरावर धर्म, अर्थ आणि काम ह्या संदर्भात अनेक शिल्प आढळतात. धर्म सांगण्यासाठी रामायण महाभारत आणि पुराणातल्या इतर अनेक कथांचा वापर करून विविध शिल्प घडवलेली दिसतात. तर पूर्वीच्या काळात अर्थकारण कसं चालायचं याचा दृष्टांत म्हणून शेतीकाम, पशुपालन इत्यादी अनेक शिल्प बाह्य भिंतीवर आढळतात( जी लोकांनी हेतू पुरस्करपणे नेहमी दुर्लक्षित ठेवली). काम शिल्प ही केवळ खजूराहो मंदिरात आहेत असा अनेकांचा गैरसमज आहे मात्र ते तसे नसून काम शिल्प बऱ्याचशा मंदिरांच्या मंडोवरावर आढळतात. मुळातच, एखाद्या गोष्टीचा मूळ हेतू ज्ञात नसल्यास त्याबद्दल वावड्या उठणं अत्यंत स्वाभाविक ! धर्म, अर्थ, काम हे बाहेर बाह्य भिंतींवर कारण मोक्ष मिळण्याआधी हे सर्व करणे गरजेचे असे शास्त्रकारांनी सांगितले. आधी प्रपंच करावा नेटका ! हे सर्व जगून देवळाबाहेरच ठेवून देवळाच्या आत मोक्ष मिळावा म्हणून प्रवेश करावा ही इतकी साधी सोपी शास्त्रकारांची योजना !
काम शिल्पांसोबतच त्याच धाटणीतली परंतु एक आगळी वेगळी मूर्ती मंदिरांच्या बाह्य भिंतीवर आढळते ती म्हणजे लज्जागौरी ! लज्जागौरी म्हणजेच स्त्रीच्या मातृत्वाचे पूजन. आपल्याला ज्या स्त्रीने जन्म दिला ती स्त्री म्हणजे निसर्गाची एक किमयाच ! अगदी पूर्वापार मनुष्य प्राण्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटली किंवा जेव्हा जेव्हा तो त्या गोष्टीला पूर्णतः वश करू शकला नाही तेव्हा तेव्हा त्याने त्या गोष्टीचं पूजन केलं. उदाहरणादाखल पर्जन्य, अग्नी, वायू आकाशातले तारे जसे की सूर्य, चंद्र इत्यादी गोष्टी एक तर भयामुळे किंवा मनुष्याची त्यांच्या प्रति असलेल्या कृतज्ञतेमुळे पूजनीय झाल्या. तसंच मातृत्व ही सुद्धा इतक्या सहस्त्र वर्षांनंतरही अनाकलनीय आणि अचाट संकल्पना आहे ! म्हणूनच लज्जा गौरीच्या मातीच्या , काष्ठ म्हणजे लाकडावर कोरलेल्या आणि दगडात कोरलेल्या मूर्ती अगदी मोहेंजोदारो काळापासून आढळतात.
आता लज्जा गौरीची प्रतिमा ओळखायची कशी ? सर्वप्रथम लज्जा गौरी म्हणजे स्त्रीची नग्न प्रतिमा ! इथेच सर्वसामान्य मनुष्य गोंधळून जातो की पूजनच करायचं तर नग्न प्रतिमेचे कारणच काय ? आता हे समजून घ्या की मातृत्वाचे पूजन म्हणजे जन्म होण्यापूर्वी योनीद्वारे गर्भधारणा, गर्भात असताना आपण आईशी नाळेने जोडलेलो असतो म्हणून बेंबी, योनी द्वारे स्त्री प्रसूती करते म्हणून पुन्हा योनी, आणि जन्मानंतर अपत्याचे स्तनांद्वारे पालनपोषण आई करते म्हणून हे अवयव अतिशय महत्वाचे ! त्यामुळे हे सर्व अवयव ठसठसशीत पणे दिसावेत म्हणूनच नग्न प्रतिमेची योजना, अन्य दुसरे कारण नाही. त्यातही योनीचा भाग जास्त ठळकपणे दिसावा म्हणून मांड्यांची रचना इंग्रजी अक्षर ( M ) प्रमाणे केलेली दिसते.
चित्र क्र. १ भिवंडी येथील लोणाडच्या शिवमंदिरातील लज्जागौरी
चित्र क्र. २ मोढेरा येथील सूर्य मंदिरातील मुख्य मंदिराच्या बाह्य भिंतीवरील राणीच्या प्रसुतीचे शिल्प पट
लज्जा गौरीच्या अनेक मूर्ती भारतभर आढळतात त्यात तीन वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आढळून येतात. पहिला प्रकार म्हणजेच या मूर्तीला स्त्रीचा चेहरा आढळून येतोआणि त्यासोबतच वर उल्लेख केल्याप्रमाणे मातृत्व निर्देशक अवयव ठळकपणे दर्शवलेले असतात. ह्या मधला दुसरा आणि तिसरा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैशिष्ट्यपूर्ण ह ह्यासाठी की शास्त्रकारांनी हे वेळेवरच जाणले की लज्जा गौरीचे नग्न शिल्प जर चेहऱ्यासकट दर्शवलं तर मनुष्य चेहऱ्याकडे आकर्षित होऊ शकतो आणि मातृत्व पूजन होण्याऐवजी वासनेची निर्मिती होऊ शकते. हे टाळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी एकतर चेहऱ्याऐवजी कमळ दर्शवलं आहे किंवा धडाखालचा भागच शिल्पांकित केला गेला. अशा पद्धतीने मूळ हेतुला फाटा न देता मातृत्व पूजनावर शास्त्रकारांनी भर दिला. लज्जा गौरीचं स्वतंत्र शिल्प असलेली देवळही आढळतात आणि त्यांचे पूजनही केलं जातं आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे वेगवेगळ्या मंदिरांच्या बाह्य भिंतीवरही लज्जा गौरी आढळते मात्र ती शोधावी लागते.
आज आपण भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे असं जरी म्हणत असलो तरीसुद्धा जन्म हा स्त्रीच देऊ शकते पुरुष केवळ निमित्त मात्र ! जुन्या काळामध्ये ही वीर पुरुष हे स्वतःच्या आईच्या नावाने किंवा आईच्या कुळाने ओळखले. देवकीनंदन कृष्ण, कौशल्या पुत्र राम हे पुराणातले संदर्भ, तर थोडंसं मागे गेलो तर 2200 वर्षांपूर्वी असलेल्या सातवाहन सत्तेत गौतमीपुत्र सातकर्णी हा बलाढ्य राजा स्वतःच्या आईचे नाव लावत असे. शहाजीराजांचे पुत्र असले तरी छत्रपती शिवाजी महाराज हे ओळखले जातात जिजाऊ मातेमुळेच ! पण असो कालाय तस्मै नमः ।
लज्जा गौरी या शिल्पाला इतरही अनेक पैलू आहेत जे सर्व समावेशक लेखांमध्ये देता येत नाही त्यामुळे त्यांचा संक्षेप देतो. अधिक माहितीसाठी मला संपर्क करा.
संदर्भ: - लज्जागौरी, रा. चिं. ढेरे.
लोभ असावा !
राहुल अभ्यंकर , विरार !
Instagram - chaturthamiti
टिप्पण्या
नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण व बारकावे टिपणारा लेख ! गौहाटी(आसाम)ची सुप्रसिद्ध कामाख्या देवीचं रूपही लज्जागौरीचं आहे बहुतेक !
प्रतीके तीच आहेत, मंदिराच्या तळाशी असणारे कुंडातील लालसर पाणी हे रज:स्वला रूपाचे प्रतीक मानले जाते.
'बहुतेक' लिहिण्याचे कारण म्हणजे आता ते मंदिर एकदम व्यापारी स्वरूपाचे झाले आहे. 500रुपये प्रति व्यक्ती देऊन, अडीच तास रांगेत उभे राहून देवीची मूर्ती काही दिसली नाही आम्हाला, पैसे मागणाऱ्या पुजाऱ्यांनी हैराण मात्र केलं . 😢
आज पहिल्यांदा तुझे लिखाण वाचायचा योग आला आणि विषय व त्यावरील अभ्यास ह्यासाठी तुझे मनापासून कौतुक! आपल्या संस्कृतीला विज्ञानाचा पाया आहे ह्याची प्रचिती तुझ्या वाचकांना नक्कीच येईल. अभिनंदन. तुझ्या पुढील लेखासाठी आतुर.
अमोल सावंत
संतोष जोशीं
बोरीवली
सखोल व संपूर्ण माहिती असलेल हा लेख अतीशय आवडलं।
दिपक साजनेकर