॥ हर हर महादेव ॥
ब्रम्हा विष्णू आणि महेश यापैकी महेश म्हणजेच शंकर ही विनाशाची देवता मानली जाते. शिव हा काही नुसतेच तत्परतेने जाऊन दैत्यांचा तावडीतून आपल्या भक्तांना सोडवतो असे नाही, तर तो मृत्यूची देवता 'यम' व प्रेमाची देवता 'मदन' यांना सुद्धा वेळप्रसंगी निष्प्रभ करतो व त्यांच्यावर विजय मिळवतो. तसेच आचरणात काही आगळीक केली म्हणून तो ब्रह्मदेवालाही धडा शिकवतो. तसेच त्रासदायक ठरू लागल्यावर तो नरसिंहालाही क्षमा करत नाही. त्यामुळेच शिव हा संहारक तर आहेच पण तो भयावह सुद्धा आहे.
गजहा
सर्वांत प्राचीन संहारक मूर्ती ही गजहामूर्ती असून ती इसवीच्या ६व्या शतकातील आहे. कूर्मपुराणामध्ये विस्ताराने सांगितली आहे. लिंगपूजा व तपश्चर्या करणाऱ्या ब्राह्मणांना हत्तीच्या रूपात येऊन त्रास देणाऱ्या नीलासुर नावाच्या दैत्याचा शिवाने कसा नाश केला. याची ही कथा आहे. असे सांगितले जाते की ही घटना वाराणसी येथे घडली. होती. शिवाने या हत्तीरूपी दानवाचा वध केला आणि त्याचे चामडे स्वतः पांघरले व वाराणसी इथे कृत्तिकेश्वर नावाच्या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या ब्राह्मणांना या दैत्याच्या त्रासातून मुक्त केले. याच घटनेचे दुसरे पण काहीसे निराळे वर्णन हे वराहपुराणामध्ये येते. ते असे की, असुरांचा राजा अंधक हा पार्वतीच्या रूपावर मोहित झाला. त्याचवेळी त्याचा सहाय्यक नीलासुर हा हत्तीचे रूप घेऊन शिवाला मारण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. ज्या वेळी नंदीला या नीलासुराच्या पापी कृत्याचे वृत्त समजते तेव्हा तो हे सर्व वीरभद्राला जाऊन सांगतो. त्याबरोबर तत्काळ वीरभद्र तिथे येऊन हत्तीच्या रूपातील नीलासुराचा वध करतो व त्याचे कातडे शिवाला अर्पण करतो. शेवटी शिवाच्या हातून अंधकासुराचाही वध होतो.
कर्नाटकातल्या हासन जिल्ह्यात हळेबीडू येथे होयसळेश्वर मंदिर आहे. त्यात आतमध्ये शिव लिंग आहे आणि शिवाचे पूजन केले जाते. या मंदिराच्या बाह्य भिंतीवर गजहा मूर्तींचे दर्शन घडते.
येथे शिवाला आठ हातांचा दाखवलेला आहे. त्यापैकी वरचे दोन हात हत्तीचे चामडे डोक्यावर उचलून धरताना दिसतात. शिवाभोवती गजचर्माची प्रभावळ दिसते. चारही टोकांना हातीचे चार पाय दिसतात. शंकराचा उजवा पाय हत्तीच्या डोक्यावर दिसतो. सर्वात वरच्या भागात हत्तीचे शेपूट दिसते. हत्तीच्या गंडस्थळावर, मानेवर सोंडेवर आणि पायात उत्तम अलंकार दिसतात.
शिवाची मूर्ती त्रिभंग मुद्रेत दाखवलेली आहे.त्रिभंग मुद्रा म्हणजे पाय धड आणि चेहरा हे तिन्ही एका रेषेत न दाखवता तिघांनाही वेगवेगळ्या अक्षांमध्ये दाखवलं जातं. भरतनाट्यम नृत्य प्रकारात अशा मुद्रा आवर्जून बघायला मिळतात. सदर हत्ती रुपी दैत्याचा विनाश केल्याने शिव अत्यानंदाने नृत्य करताना दिसत आहे.
समोरील दोन हात नृत्य करताना आवश्यक असणारा तोल सांभाळताना दिसत आहे. तर उरलेल्या दोन हातात त्रिशुळ आणि डमरू दिसतात. एका हातातलं आयुध अस्पष्ट आहे तर उरलेल्या हातात मानवी मुंडकं शिवाने धारण केलेले दिसते.
शिवाने उत्कृष्ट अलंकार धारण केलेले दिसतत. कवट्या असलेला मुकुट, हातातल्या अंगठ्या, बाजूबंध, डाव्या दंडावर किर्तीमुख, कंबरपट्टा, पायातले तोडे निरखून पाहावेत असे आहेत. संहारक मूर्ती असल्यामुळे शंकराचा तिसरा डोळा ही दाखवलेला आहे. त्याच सोबत दोन सुळे तोंडातून बाहेर येताना दाखवले आहेत. शिवाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजेच गळ्यातला सर्प आणि त्यांचं वाहन नंदी हे सुद्धा शिल्पामध्ये कोरलेले दिसतात .
अशाच प्रकारच्या गजहा मूर्ती भारतभर आढळतात. काही ठिकाणी हात कमी जास्त आहेत आणि आयुधांमध्ये फरक दिसून येतो.
संदर्भ :- शिवमूर्तये नमः, डॉ. गो बं देगलूरकर.
लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार .
टिप्पण्या