॥ हर हर महादेव ॥
चूल आणि मूल इतकीच चाकोरीबद्ध भूमिका स्रियांनी निभावली हे आपल्याला इतिहासकारांनी मनावर अगदी सहजपणे ठसवलं. पण भारतीय इतिहास केवळ पुस्तकांमधून नाही तर शिलालेख, बारव, मंदिरं आणि वीरगळ अशा अनेकोत्तम साधनांमधून वाचता येतो. आपल्याकडे लागते ती केवळ दृष्टी !
मागे सोलापूरच्या सहलीमध्ये सकाट गावात एक वीरगळ माझ्या दृष्टीस पडला. मारुतीच्या मंदिरात मारुतीच्या मूर्तीशेजारीच असे दोन वीरगळ पहायला मिळतात. ही गोष्ट मला सर्वत्र आढळली की वीरगळांचा संदर्भ काहीकदा लागत नसल्याने ते गावाच्या वेशीवर, देवळांमध्ये किंवा किल्ल्यांवर कुठेतरी कडेला लावून ठेवलेले दिसतात.
चित्र क्र १ . वीरगळाचे छायाचित्र .
चित्र क्र २. वीरगळाचे संपादित केलेलं छायाचित्र .
वीरगळ म्हणजे एक शिल्पपटच असतो. आणि म्हणून त्याला टप्प्या टप्प्यानेच समजून घ्यावं लागतं.
टप्पा क्र १. खालून पहिला कप्पा.
नेहमीप्रमाणे वीरगळाचा खालचा कप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवतो. इथे पुरुषांऐवजी दोन स्त्रिया ( पिवळा रंग ) हातात ढाल आणि तलवार घेऊन लढताना दिसतात. गुडघ्यापर्यंत आलेली वस्त्रं, केसांचा बांधलेला अंबाडा, कानात झुलणारी भली मोठी कर्णकुंडलं लक्ष वेधतात. ( चित्र क्र १ . पाहावे ) .
टप्पा क्र २ . खालून दुसरा कप्पा.
खालून दुसरा कप्पा हा मृत्यूपश्चात घडणाऱ्या गोष्टींचं वर्णन करतो. युद्धभूमीत मृत्यू आलेल्याला स्वर्ग मिळतो अशी शास्त्रात नोंद आहे. त्याप्रमाणे दोन अप्सरा ( हिरवा रंग )ह्या मृत्यू पावलेल्या स्रीला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आलेल्या दिसतात. स्वतःच्या खांद्यावर बसवून त्या वीर स्त्रीच्या आत्म्याला स्वर्गात नेताना दिसतात. वीर स्त्री स्वत:चे दोन्ही हात अप्सरांच्या खांद्यावर ठेवून उभी दिसते. सोबतच अप्सरा हातातल्या चवऱ्या ( लाल रंग ) ढाळताना दिसतात. चवऱ्या म्हणजे पूर्वी राजे महाराजांच्या बाजूला दासी उभी राहून वारा घालत ते साधन.
टप्पा क्र ३ . खालून तिसरा कप्पा.
या कप्प्यात वीर स्त्री मांडी घालून बसलेली दिसते. समोरच असलेल्या शिवपिंडी समोर नतमस्तक होऊन शिवआराधना करताना दिसते. स्वर्ग प्राप्ती झाल्यानंतर स्वतःच्या आराध्य देवाचं पूजन करण्याचा प्रसंग सर्वच वीरगळांवर आढळतो. असं असलं तरी बहुतांश वीरगळांवर शिवपिंडच आढळते हे विशेष.
टप्पा क्र ४ . सर्वात वरचा कप्पा.
सर्वात वरचा कप्पा हा सदर वीरेला मोक्ष प्राप्ती झाली हे कलशाच्या माध्यामतून दर्शवतो. कलश हा वीरगळाचा आणि वीर मनुष्याचं अंतिम ध्येय दर्शवतो. सहसा कलशाच्या रक्षणासाठी वाघ हत्ती शरभ इ. प्राणी किंवा काही मंगलचिन्ह कोरलेली असतात. ती इथे कुठेही मला आढळली नाहीत.
नेहमीप्रमाणे वीरगळावर कोणताही शिलालेख नसल्याने त्याचा काळ, लढाईचं विशिष्ट कारण इ. गोष्टींचा सहज बोध होत नाही. पण अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या प्रसिद्धी पावलेल्या रणरागिणींसोबतच अश्या काही प्रसिद्धी न पावलेल्या स्त्रियाही संसारासोबतच संरक्षणातही कर्तव्य चोखपणे बजावत होत्या हे कौतुकास्पदच !
लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार.
टिप्पण्या