॥ श्री गणेशाय नमः ॥
एखाद्या लेण्यामध्ये शांतचित्ताने डोळे मिटून ध्यान करावं आणि डोळे उघडल्यावर साक्षात समुद्र देवाचे दर्शन व्हावं असा अनुभव देणारं एकमेव लेणं हे कोकणात मुरुड मध्ये मांदाड गावाजवळ कोरलेलं आहे. नेहमीप्रमाणे एखाद दुसरे लेणं नसून इथेही २६ लेण्यांचा समूह दिसतो. कोकणाची ओळख असलेल्या जांभा खडकांमध्ये ही लेणी नाहीत हेही त्याचं एक वैशिष्ट्य ! लेणी बेसॉल्ट खडकात कोरलेली असून त्यात बुद्ध, समुद्री घोडा आणि दान देणाऱ्या युगुलाचं शिल्प इत्यादी अनेक शिल्प आढळतात. सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे प्रत्येक लेण्यांच्या दारावर आढळणारे शिलालेख आणि त्यांना कोरताना कोरक्याने वापरलेली प्रतिभा संपन्न वळणं. जुन्नर, नाशिक इत्यादी ठिकाणी आढळणाऱ्या शिलालेखांपेक्षा या शिलालेखांमधली ब्राम्ही लिपी ही थोडी वेगळी आहे आणि तिचं सौंदर्य अगदी दुरूनही नजरेत भरतं.
चित्र क्र १ . मांदाड येथील कुडा लेणी ( छायाचित्र सौजन्य: maharashtratourism.co.in)
लेण्यांचे ठिकाण निवडताना दगडाची निवड,दगडाचा पोत, दगडाचे पाणी साठवण्याची क्षमता आणि तीव्र उन्हाळ्यात टाक्यांमध्ये पाणी आटल्यास आजूबाजूला बारमाही वाहणाऱ्या नदीची व्यवस्था या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जात असे. त्यातल्या त्यात ही लेणी समुद्राच्या काठावर आहेत आणि त्यातून दिसणारं समुद्राचं दृश्य अगदी विहंगम आहे.
चित्र क्र . २ कुडा लेण्यांमधील बुद्ध शिल्प .
ह्या लेण्या हिनयान आणि महायान पंथांच्या मिश्रणातून बनलेल्या लेण्या आहेत . इसवी सन पूर्व काळात लेण्या खोदायला सुरुवात झाली होती. त्यामुळे हिनयान पंथात आढळणाऱ्या लेण्यांची वैशिष्ट्य जसं की लेणी समूह चैत्यगृह, विहार आणि स्तूप इथे आढळतात. सोबतच महायान पंथाची वैशिष्ट्य म्हणजेच गौतम बुद्धांची शिल्प ही कालांतराने महायान पंथ सुरू झाल्यानंतर इथे कोरली गेली. लेण्यांची एकंदर दुमजली रचना आहे . पहिल्या मजल्यावर लेणी,त्याच्यात काही शिल्पं, पाण्याच्या टाक्या आणि प्रत्येक ठिकाणी आढळणारे शिलालेख आहेत . तर दुसऱ्या मजल्याच्या सुरुवातीला एक भव्य स्तूप, त्याभोवती प्रदक्षिणापथ आणि शिलालेख आढळून येतात. संपूर्ण दुसरा मजला चढून गेल्यावरती लेण्यांचा समूह, शिलालेख आणि पाण्याची टाकी या गोष्टी आढळतात. दुसऱ्या मजल्यावर कुठेही शिल्पकाम आढळून येत नाही.
चित्र क्र . ५ . ब्राम्ही लिपीतील शिलालेख
चित्र क्र . ६ शिलालेखातील सुस्पष्ट अक्षरं आणि झोकदार वळणं असलेली अक्षरं
चित्र क्र . ७ शिलालेखातील ऊन पाऊस वारा झेलूनही सुस्पष्ट असलेली अक्षरं
चित्र क्र . ८ प्रवेशद्वारावरील शिलालेख
चित्र क्र . ९ पाण्याच्या टाक्यांवरील शिलालेख
चित्र क्रमांक पाच ते नऊ हे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आढळणारे शिलालेख दर्शवतात. ब्राम्ही लिपी अत्यंत आकर्षक पद्धतीने अनेकविध झोकदार वळणं घेत कोरलेली इथे बघायला मिळते. दगडावर शिलालेख कोरताना तो अत्यंत काळजीपूर्वक नाजूकपणे आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने कोरलेला दिसतो. ब्राह्मी लिपीच्या अक्षरांची खरी नजाकत अनुभवायचे असेल तर या लेण्यांना नक्की भेट द्या ! दोन एक हजार वर्षांमध्ये पाहिलेली स्थित्यंतरं लेण्यांच्या अक्षर सौंदर्याला बाधा पोहोचू शकली नाहीत हे विशेष ! व्हरांड्यात, भिंतीवर, पाण्याच्य टाक्यांवर अशी जळी स्थळी शिलालेखांनी नटलेली ही लेणी अक्षरप्रेमींसाठी नंदनवन आहेत. केवळ ब्राम्ही भाषेचं मूलभूत ज्ञान असणाऱ्यांनाही हे शिलालेख मंत्रमुग्ध करून टाकतील इतकं नक्की !
चित्र क्र . १० लेण्यांच्या खिडकीतून दिसणारा समुद्र
चित्र क्र . ११ लेण्यांच्या वरच्या भागातून दिसणारं समुद्राचं विहंगम दृष्य.
समुद्राचा सहवास लाभलेल्या लेण्या भारतात अगदी तुरळकतने आढळतात. मांदाड गाव हे पूर्वी खूप प्रसिद्ध बंदर होतं आणि या गावाला रोम ग्रीस इत्यादी ठिकाणाहूनही पर्यटकांनी भेट दिल्याच्या नोंदी आहेत. लेण्यांचं भौगोलिक स्थान बघितल्यास लेण्या केवळ वर्षावासासाठी नसून सदर बंदरावरती टेहळणीसाठी ही वापरल्या जात असाव्यात त्याच सोबत बंदरातून येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचारही करण्याचे उपयोगात येत असाव्यात असं प्रकर्षाने जाणवते.
तळ टीप : लेणी गुगल मॅप वर निट दर्शवलेली नसल्याने जवळपास जाऊन गावात चौकशी करत पुढे जावे .
लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार .
टिप्पण्या