शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी
॥ श्री गणेशाय नमः ॥
भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .
चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया .
विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे, आठ पाय, दोन पंख व लांब शेपूट असलेल्या शरभाचे रूप धारण करून नृसिंहास फाडले आणि त्याचे कातडे पांघरले व डोके मुकुटावर धारण केले अशी एक कथा आहे. ( संदर्भ : मूर्तिविज्ञान, डॉ. गणेश हरि खरे ) .
हल्लीच्या काळामध्ये जसे सामर्थ्याचे प्रतीक पंचमुखी हनुमानाची प्रतिमा किंवा चित्र दरवाजावर लावण्याची पद्धत आहे तीच पद्धत जुन्या काळामध्ये किल्ल्यांच्या दरवाजावरती शरभाचे शिल्प कोरण्यात दिसून येते . तसंच लढाईच्या वेळेस स्फुरण चढण्यासाठी हर हर महादेव म्हणणार्या मराठ्यांच्या किल्ल्यांवर शंकराचे रूप असणाऱ्या शरभाचं शिल्प हा निव्वळ योगायोग असावा का? तसंच महापराक्रमी राजांच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ कोरल्या जाणाऱ्या काही वीरगळांच्या कलशाभोवती देखील शरभ आढळतात . वीरगळ म्हणजे ?
शरभ या प्राण्याचे अनेक प्रकार असून त्यात पंखधारी , पंख विरहित , गज जेता म्हणजे ज्याने पायात हत्तींना दाबून धरले आहे ( ह्यावरून शरभाच्या सामर्थ्य आणि विराटरूपाची कल्पना करता येते . ) , व्याघ्रजेता म्हणजे ज्याने वाघाला स्वतःच्या पायात धरले आहे असे अनेक प्रकार आहेत .
सोलापूरच्या भुईकोटात जीर्णोद्धाराच्या वेळेस ही शरभ शिल्प कोरण्यात आली . महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले मराठ्यांनी जिंकल्यावर त्यांचा जीर्णोद्धार करण्यात आला .
किल्ले जंजिरा हा सिद्दी नावाच्या मुसलमान राज्यकर्त्याने बांधलेला किल्ला होता . हा अभेद्य किल्ला आजवर कोणत्याही हिंदू राज्यकर्त्यांनी जिंकला नाही हे जग जाहीर आहे .तरीही या किल्ल्यामध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजावर ती शरभाचे शिल्प दिसून येतं .
चित्र क्रमांक ४ . किल्ले शिवनेरी ( शिव जन्मभूमी जुन्नर ) येथील आतल्या प्रवेशद्वारा वरील केवल शरभ शिल्प .
चित्र क्रमांक . ५ मधील शरभ हा व्याघ्रजेता शरभ आहे . म्हणजे त्याने वाघाला पायात धरले आहे किंवा त्यावर विजय मिळवला आहे . शरभाचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे पंख दिसून येतात . उघडलेले तोंड आणि बाहेर आलेली जीभ त्याच्या आक्रमकतेचे प्रदर्शन करतात .
चित्र क्रमांक सहा मध्ये शरभाचं सर्वात आक्रमक रूप दिसतं . द्विगज विजयी शरभात् पराभूतौ पक्षीदेहधारी गंडभेरुंड, म्हणजे एका पायात गंडभेरूड ( दोन तोंडे असणारा पक्षी ) तर बाकी दोन पायात हत्तींना चिरडणारा असा शरभ शिवनेरीच्या प्रवेश द्वारावर आढळतो . ह्या शरभाचं पण अत्यंत बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे पंख दिसून येतात म्हणून त्याचं पक्षीदेह धारी असं यथार्थ वर्णन केले आहे .
गंडभेरुंड हासुद्धा एक पौराणिक पक्षी असून तोही अत्यंत सामर्थ्यवान आहे . त्याची छायाचित्रे आणि माहीती मी वेगळ्या लेखात सविस्तर पणे देईन .
लोभ असावा !
- राहुल अभ्यंकर , विरार .
अतिरिक्त माहिती आणि छायाचित्रांसाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा.
टिप्पण्या
खुप छान माहिती