मुख्य सामग्रीवर वगळा

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी


॥ श्री गणेशाय नमः ॥

भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .


 चित्र क्रमांक १ . जलदुर्ग अर्नाळा येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प .

चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया .

विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे, आठ पाय, दोन पंख व लांब शेपूट असलेल्या शरभाचे रूप धारण करून नृसिंहास फाडले आणि त्याचे कातडे पांघरले व डोके मुकुटावर धारण केले अशी एक कथा आहे. ( संदर्भ : मूर्तिविज्ञान, डॉ. गणेश हरि खरे ) .

हल्लीच्या काळामध्ये जसे सामर्थ्याचे प्रतीक पंचमुखी हनुमानाची प्रतिमा किंवा चित्र दरवाजावर लावण्याची पद्धत आहे तीच पद्धत जुन्या काळामध्ये किल्ल्यांच्या दरवाजावरती शरभाचे शिल्प कोरण्यात दिसून येते . तसंच लढाईच्या वेळेस स्फुरण चढण्यासाठी हर हर महादेव म्हणणार्या मराठ्यांच्या किल्ल्यांवर शंकराचे रूप असणाऱ्या शरभाचं शिल्प हा निव्वळ योगायोग असावा का? तसंच महापराक्रमी राजांच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ कोरल्या जाणाऱ्या काही वीरगळांच्या कलशाभोवती देखील शरभ आढळतात . वीरगळ म्हणजे ?

 शरभ या प्राण्याचे अनेक प्रकार असून त्यात पंखधारी , पंख विरहित , गज जेता म्हणजे ज्याने पायात हत्तींना दाबून धरले आहे ( ह्यावरून शरभाच्या सामर्थ्य आणि विराटरूपाची कल्पना करता येते . ) , व्याघ्रजेता म्हणजे ज्याने वाघाला स्वतःच्या पायात धरले आहे असे अनेक प्रकार आहेत .


 चित्र क्रमांक २ . भुईकोट सोलापूर येथील बुरुजावरील शरभशिल्प .

सोलापूरच्या भुईकोटात जीर्णोद्धाराच्या वेळेस ही  शरभ शिल्प कोरण्यात आली . महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले मराठ्यांनी जिंकल्यावर त्यांचा  जीर्णोद्धार करण्यात आला .


 चित्र क्रमांक ३ . जलदुर्ग किल्ले जंजिरा ( मुरुड ) येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प .

किल्ले जंजिरा हा सिद्दी नावाच्या मुसलमान राज्यकर्त्याने बांधलेला किल्ला होता . हा अभेद्य किल्ला आजवर कोणत्याही हिंदू राज्यकर्त्यांनी जिंकला नाही हे जग जाहीर आहे .तरीही या किल्ल्यामध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजावर ती शरभाचे शिल्प दिसून येतं .


 चित्र क्रमांक ४ . किल्ले शिवनेरी ( शिव जन्मभूमी जुन्नर ) येथील आतल्या प्रवेशद्वारा वरील केवल शरभ शिल्प .


 चित्र क्रमांक ५ . किल्ले शिवनेरी ( शिव जन्मभूमी जुन्नर ) येथील आतल्या प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प .

चित्र क्रमांक . ५ मधील शरभ हा व्याघ्रजेता शरभ आहे . म्हणजे त्याने वाघाला पायात धरले आहे किंवा त्यावर विजय मिळवला आहे . शरभाचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे पंख दिसून येतात . उघडलेले तोंड आणि बाहेर आलेली जीभ त्याच्या आक्रमकतेचे प्रदर्शन करतात .


 चित्र क्रमांक ६ . किल्ले शिवनेरी ( शिव जन्मभूमी जुन्नर ) येथील मुख्य प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प .

चित्र क्रमांक सहा मध्ये शरभाचं सर्वात आक्रमक रूप दिसतं . द्विगज विजयी शरभात् पराभूतौ पक्षीदेहधारी गंडभेरुंड,  म्हणजे  एका पायात गंडभेरूड ( दोन तोंडे असणारा पक्षी ) तर बाकी दोन पायात हत्तींना चिरडणारा असा शरभ शिवनेरीच्या प्रवेश द्वारावर आढळतो . ह्या शरभाचं पण अत्यंत बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे पंख दिसून येतात म्हणून त्याचं पक्षीदेह धारी असं यथार्थ वर्णन केले आहे .

 गंडभेरुंड हासुद्धा एक पौराणिक पक्षी असून तोही  अत्यंत सामर्थ्यवान आहे . त्याची छायाचित्रे आणि माहीती मी वेगळ्या लेखात सविस्तर पणे देईन .

लोभ असावा !
- राहुल अभ्यंकर , विरार .

अतिरिक्त माहिती आणि छायाचित्रांसाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा.


चतुर्थमितीचे इतर लेख  















टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Kolhapur अंबाबाई मंदिरा परिसरात अपल्याला अशाच शिल्पाचे दर्शन घड़ते


खुप छान माहिती
Rahul Abhyankar म्हणाले…
हो ! बऱ्याच मंदिरांच्या दारावरही आढळतो .

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रावणानुग्रह - शिवमूर्तये नम: !

हर हर महादेव  प्राचीन मंदिरांची विविध उप अंगे आहेत. त्यातलं सर्वात लक्षणीय अंग म्हणजे मंडोवर म्हणजेच मंदिराची बाह्य भिंत. ह्या बाह्य भिंतीवर मंदिराच्या आतल्या देवते सोबतच्या इतर उप देवता , त्या मुख्य देवतेचे अवतार कार्य , काही प्रसंगी रामायण, महाभारत इत्यादी पौराणिक कथांचे , युद्ध प्रसंगांचे शिल्प किंवा शिल्प पट आढळतात. सर्वात जास्त शंकर आणि विष्णूची देवळं आढळतात आणि जो देव मुख्य गाभाऱ्यात स्थापित असेल, त्याची शिल्पं जास्त आणि दुसऱ्याची काही मोजकी शिल्पं ह्या बाहय भिंतीवर आढळतात. त्यातली सर्वात आकर्षक आणि नित्य आढळणारी मूर्ती म्हणजे रावणानुग्रह ! आकर्षक ह्यासाठी की सदर मूर्तीमध्ये अनेक रसांचं वर्णन आहे जसं की वीर, करुणा,शृंगार, भय इत्यादी ! हे सर्व रस आणि कैलास पर्वत, शिवाचे गण, दास, दासी, नंदी इत्यादी दाखवताना मूर्तिकाराच्या कौशल्याचा कस लागतो. मंदिरात आढळणाऱ्या या बऱ्याच मूर्ती एकमेव शिल्प नसून अनेक शिल्पांचा शिल्पपट असतो. शिल्पपट समजण्याकरता त्याची मूळ कहाणी माहीत असावी लागते आणि त्या मूळ कहाणीचा आधार घेत संपूर्ण शिल्पाची कल्पना सहज करता येते. रावणानुग्रह या शिल्पाची कहाणी : - ए...

गणरायाचं खरं रूप: शास्त्र, संस्कृती आणि पर्यावरणपूरक मूर्ती !

 ||  श्री गणेशाय नम:  || " अरे राहुल ! गणपतीचे डोळे कधीही सरळ एका रेषेत आणि आडवे नसतात. गणपती हे गजवक्त्र म्हणजे हत्तीचे तोंड/मुख असलेली देवता आहे. आणि हत्तीचे डोळे तिरके असतात. तुम्ही मुंबईकरांनी स्वतःला वाट्टेल तसा गणपती घडवलात. त्याला उगाचच मानवी स्वरूप दिलंत. माणसासारखे सरळ आणि आडवे डोळे असल्यामुळे तो गणपती माणसासारखा दिसतो आणि त्यामुळे कदाचित तो तुम्हाला लोभस वाटतो. पण हि प्रथा बरी नव्हे. " इति नंदा आजोबा.  कैक वर्षांपूर्वी मी आमच्या मूळ गावी ( मिरज ) गेलो होतो. मी सुध्दा कैक वर्ष विरारच्या  गणपतीच्या कारखान्यात काम शिकत होतो. सहज म्हणून गावच्या कारखान्यात एक चक्कर मारली. सर्व गणपती थोडे वेगळे दिसले. आमच्या मुंबईत नाही असं बनत, तुमच्याकडचे साचे थोडे वेगळे आहेत. त्यावर नंदा आजोबांनी मला हे उत्तर दिलं. मुळातच तेव्हा माझी गणपती आणि मूर्ती शास्त्राबद्दलची जाण तशी बेताचीच असल्यामुळे तो विषय मग अलगद मागे पडला. पण कालांतराने मी ह्या मूर्तिशास्त्राचाअभ्यास सुरु केल्यावर मला आजोबा काय म्हणत होते ते स्पष्टपणे उलगडू लागले. अजून खोल खोल शोध घ्यायला सुरु केला तेव्ह...