मुख्य सामग्रीवर वगळा

माझी मायबोली - मराठी किती प्राचीन ?

॥ श्री गणेशाय नमः ॥

माझा मराठाचि बोलु कौतुकें 
परि अमृतातेही पैजा जिंके ॥ 

अमृतातेही पैजा जिंके म्हणणारी मराठी भाषा गेल्या किती वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि तिच्यात इतकी  रसाळता आहे, जेणेकरून ती आजही इतकी सुंदरपणे टिकून आहे याचा शोध घ्यावासा वाटला त्याकरता हा लेख प्रपंच !

सर्वप्रथम आपण हे जाणून घ्यायला हवं की एखादी भाषा जेव्हा आपण बोलतो त्या भाषेचा उगम हा नक्की कुठून झाला. तर याचा शोध घेण्यासाठी आपण जेव्हा फार मागे मागे मागे जाऊ त्यावेळेस असं जाणवतं की संस्कृत ही देवतांची बोलीभाषा होती आणि पृथ्वीवर राहणाऱ्या इतर लोकांना ज्यांना संस्कृत अगदी स्पष्ट उच्चारता आली नाही त्यांनी त्या भाषेला स्वतःच्या वेगळ्या अशा नैसर्गिकपणे सहज उच्चारता येईल अशा प्राकृत भाषेत स्वीकारलं. आता संस्कृत आणि प्राकृतात मुख्य फरक काय तर आपल्या घरातलं लहान मूल जेव्हा नव्याने भाषा शिकते तेव्हा ते त्याला निसर्गतः बोलता येणाऱ्याच अक्षरांचा उच्चार करतं आणि काही कठीण अक्षर ते इतर दुसऱ्या अक्षरांना वापरून उच्चारतं. उदाहरणार्थ राहुल मधला "रा" हे अक्षर लहान मुलांना उच्चारताना कठीण जातं आणि त्या बदल्यात ते त्याला लाउल असा उच्चार करतात. लहान मुलांचे बोबडे बोल हे त्यांच्या स्वकृत म्हणजेच प्राकृत भाषेचे उत्तम उदाहरण आहे.

अशाच पद्धतीने प्राकृत भाषांचा विकास होता ती वेगवेगळ्या भाषांमध्ये विभागली गेली जसं की मागधी, अर्ध मागधी,
 पाली, आणि प्राकृत मराठी.  हे सर्व सांगण्याचं प्रयोजन असं की साधारणत:  सर्व २००० वर्षांपूर्वीचे शिलालेख आपण लेण्यांमध्ये किंवा मंदिरात पाहतो ते संस्कृत किंवा प्राकृत मराठीमध्ये लिहिलेले असतात. या सर्व लेखांची लिपी ब्राह्मी लिपी असते आणि शब्दांचे उच्चार प्राकृत मराठीतले असतात. ज्यामुळे सर्वसामान्य माणसांना सहजपणे ते वाचताही येत नाहीत आणि समजताही येत नाहीत. 

मराठी भाषेची प्राचीनता ही मराठीत सापडणाऱ्या शिलालेखांवरून सहज सिद्ध करता येते. वास्तविक्त: मराठीतला सर्वात प्राचीन शिलालेख कुठला यात अजूनही थोडी साशंकता आहे. यात श्रवणबेळगोळ कर्नाटक येथील शिलालेख, अक्षी - रायगड जिल्हा येथील शिलालेख आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या हत्तरसंग सोलापूर जिल्ह्यातल्या संगमेश्वर मंदिरातील एका घडीव तुळईवर आढळणाऱ्या शिलालेखांचा समावेश आहे. यातील संगमेश्वर मंदिर भीमा आणि सोना नदीच्या संगमावर वसलेलं असल्यामुळे त्याचं नाव संगमेश्वर असावं. अत्यंत सुंदर असं पुरातन काळातलं हेमाडपंथी मंदिर काळाच्या ओघात नदीच्या पुरात उध्वस्त झालं होतं. उत्खननानंतर ह्या मंदिराचा जिर्णोद्धार करून ते पुनर्प्रस्थापित केलं गेलं. ह्या मंदिराची रचना आगळीवेगळी आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये शिवलिंग सुप्रतिष्ठित असून या मुख्य गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूंना अजून दोन गर्भगृह आहेत. ह्या मंदिराच्या एका तुळईवर ( beam ) हा शिलालेख कोरलेला आढळतो.


चित्र क्र. १ संगमेश्वर मंदिरातल्या शिलालेखाचे मूळ छायाचित्र 



चित्र क्र. २ प्रस्तूत शिलालेखाचे वाचन

शिलालेखाच्या वाचनाचे टप्पे


सर्वसाधारणतः कोणताही शिलालेख सुरू करताना त्याच्या सुरुवातीला ॐ किंवा स्वस्तिक किंवा गोपद्म यासारखी शुभचिन्ह काढण्याचा प्रघात होता. या प्रघाताप्रमाणे ओम आणि स्वस्ति ही दोन शुभचिन्ह लेखाच्या सुरुवातीला आढळतात. सकु ९४० आणि काळयुक्त संवत्सर हे दोन्ही शब्द कालनिर्देशात्मक आहेत . सकु ९४० म्हणजेच शके ९४०. २२०० वर्षांपूर्वी सातवाहनांच्या ( ख्रिस्तपूर्व २५० ते ख्रिस्त नंतर २५० ) साम्राज्याच्या काळामध्ये शक राज्यकर्त्यांनी स्वतःची कालगणना सुरू केली म्हणून त्याला शकगणना असे नाव पडले. ब्रिटिशांच्या ग्रेगोरियन कालगणनेच्या ७९ वर्षांनंतर सदर कालगणना सुरू झाली त्यामुळे आज २०२३ चालू असलं तरी शकगणनेनुसार आपण १९४४ ( २०२३ - ७९ = १९४४ ) सालात आहोत. त्यामुळे १९४४ ( चालू वर्ष ) - ९४० = १००४ म्हणजे सहस्त्र वर्षे अधिक ४ वर्षे आतिरिक्त इतकी प्राचीनता मराठी भाषेची आहे हे  पुराव्यानिशी सिद्ध करता येते. म्हणजेच किमान सहस्त्र वर्षे मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्या भूतलावर आहे हे सिद्ध होते. उरलेल्या शिलालेखाचा अर्थ कोण्या एका यतीला १००० निवर्तन भूमी अथवा तत्कालीन चलन दान दिले असा होतो. बहुतांश लेख संस्कृत भाषेत पण लेखाचा शेवट "वाधिनो विजेया होईता "  ह्या  मराठी शब्दांनी केलेला दिसतो.

आपले मूळ मराठी पूर्वज ?


आपल्या गणपती पूजा किंवा इतर सर्व देवतांच्या पूजेच्या सुरुवातीला संकल्प घेताना तिथी वार संवत्सर इत्यादी सर्व गोष्टींचा उच्चार करावा लागतो .त्यात १ ओळ येते ती म्हणजे " भरत वर्षे भरतखंडे जम्बुद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेतील शालिवाहन शके" , अर्थात भारत देशातल्या जंबुद्वीपातल्या दंडकारण्य म्हणजेच आजचा नाशिक आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, देशे म्हणजे भौगोलिक परिसरांच्या अनुषंगाने कोकण हे समुद्रसपाटी तर घाटमाथा आणि पठारी प्रदेश म्हणजेच देश असं समजलं जातं. या देशावरच्या गोदावरी नदीच्या दक्षिणेच्या तटावर असणाऱ्या शालिवाहनांच्या साम्राज्याच्या काळात सुरू झालेल्या शकगणनेनुसार असा ह्या एकंदर ओळीचा अर्थ आहे. या ओळीत उल्लेख केलेले सातवाहन म्हणजेच आपले आद्य मराठी साम्राज्यकर्ते. ह्या सातवाहनांच्या काळात त्यांचे मांडलिक स्वतःच्या चलनी नाण्यांवरती ' महारठी ' अशी बिरुदं  धारण करत. यातल्या महारठी या शब्दाचा अपभ्रंश होत होत आज आपण जी बोलतो ती मराठी भाषा ! या सातवाहनांमध्ये 30 राजे होऊन गेले ज्यांनी सुमारे पाचशे वर्ष महाराष्ट्रावर आणि थोडा बहुत काळ कर्नाटकावर राज्य केलं. ह्यांची सर्वात आवडती राजधानी म्हणजे पैठण ज्याला फार पूर्वीच्या काळी प्रतिष्ठान असं नाव होतं. पश्चिम किनारपट्टी वरून मोसमी वाऱ्यांचा शोध लागल्यानंतर परदेशात मसाल्याचे पदार्थ, वस्त्र, मोत्यांचे दागिने, हस्तिदंती कलाकुसरीच्या वस्तू इत्यादींचा व्यापार करून हे राज्य प्रचंड भरभराटीला आलं. पण कालांतराने त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या क्षत्रप राज्यकर्त्यांनी पश्चिमेकडील बंदरे ताब्यात घेतली आणि आर्थिक परिस्थिती ढासळल्याने हे साम्राज्य लयाला गेलं असा इतिहासकारांचा अंदाज आहे.

देवाला दाखवण्याचा नैवेद्य आम्ही व्हाट्सअपच्या स्टेटसला दाखवतो अशा युगात हा लेख मराठी वाचकांच्या आणि रसिकांच्या डोळ्यात ज्ञानाचं आणि अभिमानाचं अंजन घालेल आणि आपला इतिहास हा केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांपुरता मर्यादित नाही याची जाणीव मराठी माणसाला व्हावी हीच माझी शुभेच्छा !

 लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार.

चतुर्थमितीचे इतर लेख  

















टिप्पण्या

Unknown म्हणाले…
माहितीपरलेख 👌👌
Unknown म्हणाले…
मस्त! अभ्यासपुर्ण लेख !छान!!!
Dr. RSV म्हणाले…
खुप छान माहिती आहे.
Unknown म्हणाले…
मराठी भाषा हा अतीशय जिव्हाळचा विषय,सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासुन आभार।
NitinG म्हणाले…
खूप सुंदर.

आताच एक सर्वेक्षण वाचले - जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक १२ आहे. ही आनंददायी बाब आहे.
Dr. RSV म्हणाले…
खुप सुंदर माहिती आहे
Nehanadkarni म्हणाले…
कळेल अशा भाषेत म्हणजेच प्राकृत भाषेत खूप सुंदर माहितीपूर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी ॥ श्री गणेशाय नमः ॥ भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .  चित्र क्रमांक १ . जलदुर्ग अर्नाळा येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प . चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया . विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे...

रावणानुग्रह - शिवमूर्तये नम: !

हर हर महादेव  प्राचीन मंदिरांची विविध उप अंगे आहेत. त्यातलं सर्वात लक्षणीय अंग म्हणजे मंडोवर म्हणजेच मंदिराची बाह्य भिंत. ह्या बाह्य भिंतीवर मंदिराच्या आतल्या देवते सोबतच्या इतर उप देवता , त्या मुख्य देवतेचे अवतार कार्य , काही प्रसंगी रामायण, महाभारत इत्यादी पौराणिक कथांचे , युद्ध प्रसंगांचे शिल्प किंवा शिल्प पट आढळतात. सर्वात जास्त शंकर आणि विष्णूची देवळं आढळतात आणि जो देव मुख्य गाभाऱ्यात स्थापित असेल, त्याची शिल्पं जास्त आणि दुसऱ्याची काही मोजकी शिल्पं ह्या बाहय भिंतीवर आढळतात. त्यातली सर्वात आकर्षक आणि नित्य आढळणारी मूर्ती म्हणजे रावणानुग्रह ! आकर्षक ह्यासाठी की सदर मूर्तीमध्ये अनेक रसांचं वर्णन आहे जसं की वीर, करुणा,शृंगार, भय इत्यादी ! हे सर्व रस आणि कैलास पर्वत, शिवाचे गण, दास, दासी, नंदी इत्यादी दाखवताना मूर्तिकाराच्या कौशल्याचा कस लागतो. मंदिरात आढळणाऱ्या या बऱ्याच मूर्ती एकमेव शिल्प नसून अनेक शिल्पांचा शिल्पपट असतो. शिल्पपट समजण्याकरता त्याची मूळ कहाणी माहीत असावी लागते आणि त्या मूळ कहाणीचा आधार घेत संपूर्ण शिल्पाची कल्पना सहज करता येते. रावणानुग्रह या शिल्पाची कहाणी : - ए...

गणरायाचं खरं रूप: शास्त्र, संस्कृती आणि पर्यावरणपूरक मूर्ती !

 ||  श्री गणेशाय नम:  || " अरे राहुल ! गणपतीचे डोळे कधीही सरळ एका रेषेत आणि आडवे नसतात. गणपती हे गजवक्त्र म्हणजे हत्तीचे तोंड/मुख असलेली देवता आहे. आणि हत्तीचे डोळे तिरके असतात. तुम्ही मुंबईकरांनी स्वतःला वाट्टेल तसा गणपती घडवलात. त्याला उगाचच मानवी स्वरूप दिलंत. माणसासारखे सरळ आणि आडवे डोळे असल्यामुळे तो गणपती माणसासारखा दिसतो आणि त्यामुळे कदाचित तो तुम्हाला लोभस वाटतो. पण हि प्रथा बरी नव्हे. " इति नंदा आजोबा.  कैक वर्षांपूर्वी मी आमच्या मूळ गावी ( मिरज ) गेलो होतो. मी सुध्दा कैक वर्ष विरारच्या  गणपतीच्या कारखान्यात काम शिकत होतो. सहज म्हणून गावच्या कारखान्यात एक चक्कर मारली. सर्व गणपती थोडे वेगळे दिसले. आमच्या मुंबईत नाही असं बनत, तुमच्याकडचे साचे थोडे वेगळे आहेत. त्यावर नंदा आजोबांनी मला हे उत्तर दिलं. मुळातच तेव्हा माझी गणपती आणि मूर्ती शास्त्राबद्दलची जाण तशी बेताचीच असल्यामुळे तो विषय मग अलगद मागे पडला. पण कालांतराने मी ह्या मूर्तिशास्त्राचाअभ्यास सुरु केल्यावर मला आजोबा काय म्हणत होते ते स्पष्टपणे उलगडू लागले. अजून खोल खोल शोध घ्यायला सुरु केला तेव्ह...