॥ श्री गणेशाय नमः ॥
माझा मराठाचि बोलु कौतुकें
परि अमृतातेही पैजा जिंके ॥
अमृतातेही पैजा जिंके म्हणणारी मराठी भाषा गेल्या किती वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि तिच्यात इतकी रसाळता आहे, जेणेकरून ती आजही इतकी सुंदरपणे टिकून आहे याचा शोध घ्यावासा वाटला त्याकरता हा लेख प्रपंच !
सर्वप्रथम आपण हे जाणून घ्यायला हवं की एखादी भाषा जेव्हा आपण बोलतो त्या भाषेचा उगम हा नक्की कुठून झाला. तर याचा शोध घेण्यासाठी आपण जेव्हा फार मागे मागे मागे जाऊ त्यावेळेस असं जाणवतं की संस्कृत ही देवतांची बोलीभाषा होती आणि पृथ्वीवर राहणाऱ्या इतर लोकांना ज्यांना संस्कृत अगदी स्पष्ट उच्चारता आली नाही त्यांनी त्या भाषेला स्वतःच्या वेगळ्या अशा नैसर्गिकपणे सहज उच्चारता येईल अशा प्राकृत भाषेत स्वीकारलं. आता संस्कृत आणि प्राकृतात मुख्य फरक काय तर आपल्या घरातलं लहान मूल जेव्हा नव्याने भाषा शिकते तेव्हा ते त्याला निसर्गतः बोलता येणाऱ्याच अक्षरांचा उच्चार करतं आणि काही कठीण अक्षर ते इतर दुसऱ्या अक्षरांना वापरून उच्चारतं. उदाहरणार्थ राहुल मधला "रा" हे अक्षर लहान मुलांना उच्चारताना कठीण जातं आणि त्या बदल्यात ते त्याला लाउल असा उच्चार करतात. लहान मुलांचे बोबडे बोल हे त्यांच्या स्वकृत म्हणजेच प्राकृत भाषेचे उत्तम उदाहरण आहे.
अशाच पद्धतीने प्राकृत भाषांचा विकास होता ती वेगवेगळ्या भाषांमध्ये विभागली गेली जसं की मागधी, अर्ध मागधी,
पाली, आणि प्राकृत मराठी. हे सर्व सांगण्याचं प्रयोजन असं की साधारणत: सर्व २००० वर्षांपूर्वीचे शिलालेख आपण लेण्यांमध्ये किंवा मंदिरात पाहतो ते संस्कृत किंवा प्राकृत मराठीमध्ये लिहिलेले असतात. या सर्व लेखांची लिपी ब्राह्मी लिपी असते आणि शब्दांचे उच्चार प्राकृत मराठीतले असतात. ज्यामुळे सर्वसामान्य माणसांना सहजपणे ते वाचताही येत नाहीत आणि समजताही येत नाहीत.
मराठी भाषेची प्राचीनता ही मराठीत सापडणाऱ्या शिलालेखांवरून सहज सिद्ध करता येते. वास्तविक्त: मराठीतला सर्वात प्राचीन शिलालेख कुठला यात अजूनही थोडी साशंकता आहे. यात श्रवणबेळगोळ कर्नाटक येथील शिलालेख, अक्षी - रायगड जिल्हा येथील शिलालेख आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या हत्तरसंग सोलापूर जिल्ह्यातल्या संगमेश्वर मंदिरातील एका घडीव तुळईवर आढळणाऱ्या शिलालेखांचा समावेश आहे. यातील संगमेश्वर मंदिर भीमा आणि सोना नदीच्या संगमावर वसलेलं असल्यामुळे त्याचं नाव संगमेश्वर असावं. अत्यंत सुंदर असं पुरातन काळातलं हेमाडपंथी मंदिर काळाच्या ओघात नदीच्या पुरात उध्वस्त झालं होतं. उत्खननानंतर ह्या मंदिराचा जिर्णोद्धार करून ते पुनर्प्रस्थापित केलं गेलं. ह्या मंदिराची रचना आगळीवेगळी आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये शिवलिंग सुप्रतिष्ठित असून या मुख्य गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूंना अजून दोन गर्भगृह आहेत. ह्या मंदिराच्या एका तुळईवर ( beam ) हा शिलालेख कोरलेला आढळतो.
चित्र क्र. १ संगमेश्वर मंदिरातल्या शिलालेखाचे मूळ छायाचित्र

चित्र क्र. २ प्रस्तूत शिलालेखाचे वाचन
शिलालेखाच्या वाचनाचे टप्पे
सर्वसाधारणतः कोणताही शिलालेख सुरू करताना त्याच्या सुरुवातीला ॐ किंवा स्वस्तिक किंवा गोपद्म यासारखी शुभचिन्ह काढण्याचा प्रघात होता. या प्रघाताप्रमाणे ओम आणि स्वस्ति ही दोन शुभचिन्ह लेखाच्या सुरुवातीला आढळतात. सकु ९४० आणि काळयुक्त संवत्सर हे दोन्ही शब्द कालनिर्देशात्मक आहेत . सकु ९४० म्हणजेच शके ९४०. २२०० वर्षांपूर्वी सातवाहनांच्या ( ख्रिस्तपूर्व २५० ते ख्रिस्त नंतर २५० ) साम्राज्याच्या काळामध्ये शक राज्यकर्त्यांनी स्वतःची कालगणना सुरू केली म्हणून त्याला शकगणना असे नाव पडले. ब्रिटिशांच्या ग्रेगोरियन कालगणनेच्या ७९ वर्षांनंतर सदर कालगणना सुरू झाली त्यामुळे आज २०२३ चालू असलं तरी शकगणनेनुसार आपण १९४४ ( २०२३ - ७९ = १९४४ ) सालात आहोत. त्यामुळे १९४४ ( चालू वर्ष ) - ९४० = १००४ म्हणजे सहस्त्र वर्षे अधिक ४ वर्षे आतिरिक्त इतकी प्राचीनता मराठी भाषेची आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करता येते. म्हणजेच किमान सहस्त्र वर्षे मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्या भूतलावर आहे हे सिद्ध होते. उरलेल्या शिलालेखाचा अर्थ कोण्या एका यतीला १००० निवर्तन भूमी अथवा तत्कालीन चलन दान दिले असा होतो. बहुतांश लेख संस्कृत भाषेत पण लेखाचा शेवट "वाधिनो विजेया होईता " ह्या मराठी शब्दांनी केलेला दिसतो.
आपले मूळ मराठी पूर्वज ?
आपल्या गणपती पूजा किंवा इतर सर्व देवतांच्या पूजेच्या सुरुवातीला संकल्प घेताना तिथी वार संवत्सर इत्यादी सर्व गोष्टींचा उच्चार करावा लागतो .त्यात १ ओळ येते ती म्हणजे " भरत वर्षे भरतखंडे जम्बुद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेतील शालिवाहन शके" , अर्थात भारत देशातल्या जंबुद्वीपातल्या दंडकारण्य म्हणजेच आजचा नाशिक आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, देशे म्हणजे भौगोलिक परिसरांच्या अनुषंगाने कोकण हे समुद्रसपाटी तर घाटमाथा आणि पठारी प्रदेश म्हणजेच देश असं समजलं जातं. या देशावरच्या गोदावरी नदीच्या दक्षिणेच्या तटावर असणाऱ्या शालिवाहनांच्या साम्राज्याच्या काळात सुरू झालेल्या शकगणनेनुसार असा ह्या एकंदर ओळीचा अर्थ आहे. या ओळीत उल्लेख केलेले सातवाहन म्हणजेच आपले आद्य मराठी साम्राज्यकर्ते. ह्या सातवाहनांच्या काळात त्यांचे मांडलिक स्वतःच्या चलनी नाण्यांवरती ' महारठी ' अशी बिरुदं धारण करत. यातल्या महारठी या शब्दाचा अपभ्रंश होत होत आज आपण जी बोलतो ती मराठी भाषा ! या सातवाहनांमध्ये 30 राजे होऊन गेले ज्यांनी सुमारे पाचशे वर्ष महाराष्ट्रावर आणि थोडा बहुत काळ कर्नाटकावर राज्य केलं. ह्यांची सर्वात आवडती राजधानी म्हणजे पैठण ज्याला फार पूर्वीच्या काळी प्रतिष्ठान असं नाव होतं. पश्चिम किनारपट्टी वरून मोसमी वाऱ्यांचा शोध लागल्यानंतर परदेशात मसाल्याचे पदार्थ, वस्त्र, मोत्यांचे दागिने, हस्तिदंती कलाकुसरीच्या वस्तू इत्यादींचा व्यापार करून हे राज्य प्रचंड भरभराटीला आलं. पण कालांतराने त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या क्षत्रप राज्यकर्त्यांनी पश्चिमेकडील बंदरे ताब्यात घेतली आणि आर्थिक परिस्थिती ढासळल्याने हे साम्राज्य लयाला गेलं असा इतिहासकारांचा अंदाज आहे.
देवाला दाखवण्याचा नैवेद्य आम्ही व्हाट्सअपच्या स्टेटसला दाखवतो अशा युगात हा लेख मराठी वाचकांच्या आणि रसिकांच्या डोळ्यात ज्ञानाचं आणि अभिमानाचं अंजन घालेल आणि आपला इतिहास हा केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांपुरता मर्यादित नाही याची जाणीव मराठी माणसाला व्हावी हीच माझी शुभेच्छा !
लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार.
टिप्पण्या
आताच एक सर्वेक्षण वाचले - जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक १२ आहे. ही आनंददायी बाब आहे.